शहरात कोरोना मुळे घडले हे अन....

Foto

औरंगाबाद :    कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी गर्दी टाळणे हाच एक महत्त्वाचा उपाय असल्याने शहरातील व्यापारी बांधवांनी आज आपापले व्यवहार पूर्णतः बंद ठेवून या संदर्भात महत्त्वाची भूमिका पार पाडली.  औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने  सरकारी यंत्रणेच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी व्यापारी महासंघाने आज व उद्या व्यवहार बंदचे आयोजन केले आहे.  बंदला शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना या बंदमधून वगळण्यात आले आहे. शहरातील सर्व व्यापार्‍यांनी महासंघाच्या या निर्णयाचे भरभरून प्रतिसाद देत स्वागत केले. शहरातील सर्व बाजारपेठेत आज शुकशुकाट होता. रस्त्यावरच्या गर्दीवरही त्याचा परिणाम जाणवत होता. 
गुलमंडी, पैठण गेटवर शुकशुकाट
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या जिल्हा व्यापारी महासंघ तसेच प्रसासनाकडून शहरवासीयांना बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच धर्तीवर आज शहरातील व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी आज सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.
कोरोनासाठी एक सतर्कता म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन वारंवार केले जात आहे. याला पाठींबा देत आज जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने बंद ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन शनिवारी शहरातील मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आज शहरातील व्यापारी मंडळींनी याला पाठींबा देत बंद पाळला. यावेळी पैठगेट, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, निराला बाजार, औरंगपुरा, सराफा बाजर, कॅनॉट प्लेस, सिडको, हडको, सातारा देवळाई, उस्मानपुरा, गजानन महाराज मंदिर परिसर, जवाहननगर, शिवाजीनगर, पुंडलीकनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, जालना रोड सह आदी ठिकाणचे मार्केट पूर्णतः बंद दिसून आले. यावेळी आज संपूर्ण व्यापार्‍यांनी मार्केटमध्ये फिरून नागरिकांना कोरोना साठी काळजी घेण्यासाठी जनजागृती केली. आणि उद्या देखील बंद ठेवण्यात यावे असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, माजी अध्यक्ष अजय शहा, दीपक पहाडे, प्रफुल्ल मालाणी, लक्ष्मीनारायण राठी, गोपालभाई पटेल, विजय जैस्वाल, दीपक पहाडे, जयंत देवळाणकर, गुलाम हक्कानी, शिवशंकर स्वामी, सरदार हरिसिंग सह आदी व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी केले.  आज शहागंज, सिटी चौक, चेलीपुरा या भागात काही तुरळक दुकाने सुरू होते. त्यांना पोलीस व्हॅनद्वारे पोलिसांनी दुकाने बंद करून घरी जाण्यासाठी आवाहन करताना दिसून आले. काही व्यापारीवर्ग आणि ग्राहकांनी प्रतिसाद देत घरी गेले.
पोलीसांची गाडी आली की आम्ही पळू
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व मंदिरे देखील बंद करण्यात आली आहे. परंतु तरीही गजानन मंदिर लगत फुल- हार, पूजेचे साहित्य विक्री करणारी मंडळी सकाळी सकाळी  ठाण मांडून बसलेली होती. संतोष काथार म्हणाले, ’ अहो मॅडम, पोलीसाची गाडी कि सगळी पळत सुटतील. कालचाच शिळा माल विकत आहोत, काय करणार रिकाम पोट कोरोनापेक्षा भयंकर आहे.
संपूर्ण कॅननोट परिसर बंद होता. एक दोन रिक्षावाले आणि पोरांची टोळकी सोडली तर सगळीकडे शुकशुकाट होता. एरव्ही पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नसलेले कॅननोट आज मात्र अगदीच भकास भासत होते.
सिडको बसस्थानकासमोरील टपरीवर मुलांचे टोळके पान सुपारी खात आरामात उभे होते.टपरीचालकासहित  कुणीही मास्क लावलेले नव्हते हे विशेष. याठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षांमध्ये एकेकावेळी पाच सहा प्रवासी बसलेले होते, तरीही रिक्षाचालकहि विना मास्क, रुमालच फिरत होता.
सिडको सिग्नल आणि सेव्हन हिल सिग्नलवर वाहनचालक, कार, रिक्षा यांची गर्दी आढळून आली. सिडको सिग्नलवर लहानगा अवधूत शेवाळे शाळा बंद असल्यामुळे हार विकत होता. आमचे हातावरचे पोट आहे बाहेर नाही निघालो तर कसे करायचे असा प्रश्न अवधूतच्या वडिलांनी विचारला आणि आम्ही निशब्द झालो.
थोड्या वेळ दुकान उघडले फक्‍त
कोरोना मुळे एक सतर्कता म्हणून आज जो बंद पुकारला आहे. त्यात आम्हीही सहभागी झालो आहोत. परंतु कधी कधी माणुसकीच्या नात्याने काम करावे लागते. एक काका वारले त्यामुळे त्यांचा फोटो तयार करण्यासाठी आम्ही थोड्या वेळ दुकान उघडले आहे. फोटो फ्रेम तयार करून झाल्यावर दुकान बंद करणार असल्याचे फोटो फ्रेम विक्रेते बळीराम चांगोळे यांनी सांगितले.
उद्या बंद ठेऊ
कोरोना साठी काळजी घेऊन मी काम करत आहे. तोंडाला रुमाल लावूनच बाहेर पडलो असल्याचे बूट पॉलीश करणारे दत्ता खरात यांनी सांगितले. हातावरचे काम आहे त्यामुळे काम रोज केल्याशिवाय पर्याय नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आम्हाला कोरोना बिरोना होत नाही
रोज रिक्षा चालवितो आम्ही. आता सर्वत्र कोरोना ची भीती आहे. परंतु आम्हाला काही कोरोना बिरोना होत नाही. असे मत रिक्षाचालक दिनेश साळवे यांनी व्यक्त केले.
दिलासा : सोळा जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह
’कोरोना’ चे संशयीत रुग्ण शहरातही आढळून आले. त्यांचे स्वबचे नमुने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने पुणे येथिल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातिल सोळा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली. 16 मार्च रोजी रशिया आणि कझाकीस्थान येथून फिरून आलेल्या प्राध्यापिकेचा पॉजीटीव्ही रिपोर्ट आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचा स्वब नमुने घेण्यात आले. त्यात एकूण 24 जनांपैकी आज 16 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या होस्टेलवर राहण्याचे सांगण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता या विद्यार्थ्यांना लवकरच घरी जाता येणार आहे. हे विद्यार्थी दिल्ली, कलकत्ता, मध्यप्रदेश सह आदी राज्यातील आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker