मतदार यादीतून तीन विद्यमान नगरसेविकांची नावे गायब

Foto
औरंगाबाद :  मनपा निवडणुकीकरिता प्रशासनाने तयार केलेल्या वॉर्डरचनेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. यापाठोपाठ नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे समोर येत आहे. यात चक्क तीन विद्यमान नगरसेवकांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची नावे यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे . 
एप्रिलमध्ये मनपा निवडणूक पार पडणार आहे. याकरिता प्रशासनाने नुकतीच वॉर्ड रचना देखील तयार केली. यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे या वॉर्ड रचनेवर तब्बल ३७०  दाखल झाले होते. आक्षेप सुनावणी घेऊन काही दुरुस्त्या करण्यात आल्या . त्या देखील कागदावर असल्याचे दिसून आले. या निवडणुका करिता ९ मार्च रोजी  प्रत्येक वार्ड निहाय एक अशी ११५ वॉर्डची  प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. याला दोन दिवस उलटत नाही तोच यातही मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठे घोळ घातल्याचे समोर येत आहे. वॉर्ड क्रमांक ५७ संजय नगर येथील  एकाच कुटुंबातील तीन विद्यमान नगरसेविकांचे नावच मतदार यादीतून  उडविली असल्याचे समोर आले. मिसारवाडीच्या नगरसेविका शबनम कुरेशी, संजय नगरच्या नगरसेविका मलिका कुरेशी तर कैसर कॉलनीच्या नगरसेविका खातिजा कुरेशी अशी या नगरसेविकांची नावे आहेत.यातील दोघी काँग्रेस पक्षाच्या तर एक अपक्ष नगरसेविका आहेत.  यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची नावेही यादीतून  वगळण्यात आली आहे.विशेष म्हणजे आजू बाजूच्या वॉर्डातील यादी मध्ये देखील ही नावे नाहीत. यामुळे यादीतील नावे गेली कुठे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.  प्रकरणी संबंधितांनी मनपा निवडणूक विभागाकडे आपला आक्षेप दाखल केला आहे. 

महत्वाचे 
संजय नगर वॉर्डातील भाग क्रमांक २२ मधील ६२० मतदारांची यादीच गायब आहे. यात तीन विद्यमान नगरसेविकांची नावेही वगळण्यात आली आहे . अशी चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा उपोषण करू असा इशारा कलीम कुरेशी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker