महिलेची तक्रार घेण्यास बेगमपुरा पोलिसांचा नकार

Foto
औरंगाबाद : रिक्षाचालकाने भररस्त्यात शिवीगाळ केल्याच्या संदर्भात तक्रार देण्यासाठी बेगमपुरा पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीला मंगळवारी दुपारी धक्‍कादायक अनुभव आला. पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी हा गुन्हा आपल्या हद्दीत येत नाही म्हणत हात वर केलेच  शिवाय याचा ‘इश्यू बनवू नका’ अशी दमदार समजूत घालायलाही ते विसरले नाहीत. अर्धा-पाऊणतास वाट पाहून तक्रार न देताच ती तरुणी चरफडत ठाण्याबाहेर पडली.
सध्या देशभर महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातही काही दिवसांपासून सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. हिंगणघाटपासून अंधारीपर्यंत ही परिस्थिती असताना बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍याची ही वर्तणूक औरंगाबाद पोलिसांवर एक प्रकारचा डाग म्हटला तर चुकीचे ठरणार नाही.

इश्यू करु नका

बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या केबिनमध्ये गेली. त्यांनी मला अजीबात वेळ नसल्याचे सांगून महिला कॉन्टेबलकडे पाठवले. त्या कॉन्स्टेबलला तरुणीने घडलेला प्रसंग सांगितला आणि संबंधित रिक्षाचालकाने (क्र. एम.एच.20 डी.सी. 1134) एका महिलेचा उपमर्द केल्यामुळे त्याला धडा मिळावा अशी विनंती केली. त्यावेळी घटना क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली त्यामुळे तिकडे जा, असा प्रेमळ सल्‍ला तरुणीला देण्यात आला. खरे तर भारतात कुठेही गुन्हा घडला असेल तर कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवता येतो. नंतर हा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जातो, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे त्या तरुणीची तक्रार नोंदवून क्रांतीचौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करणे  फारसे अवघड नव्हते. मात्र 40-45 मिनिटे ती तरुणी विनवणी करीत असतानाही तिची तक्रार नोंदविण्यात आली नाही. त्या तरुणीच्या मदतीसाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना सानप यांनी आपण या तरुणीला आपल्या मोटारसायकलवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात पाठवतो असे सांगत बोळवण केली. मात्र त्यादृष्टीने काहीही हालचाल न करता त्या तरुणीस या गोष्टीचा इश्यू करु नका, असा दमदार सल्‍ला दिला. शेवटी तक्रार न देताच ती तरुणी परतली.

आयुक्‍तांनी लक्ष घालावे
सद्य:स्थितीत महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता त्यांच्या कुठल्याही लहान-सहान तक्रारींची त्वरेने दखल घेण्याची गरज असताना पोलीस ठाण्याच्या मुख्य अधिकार्‍याकडूनच अशा प्रकारचे वर्तन होत असेल तर ही गंभीर बाब म्हटली पाहिजे. या प्रकरणी पोलीस आयुक्‍तांनी स्वत: लक्ष घालून अशा घटना पुढे घडू नयेत, यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker