नवसंजीवनी देणारा मोर्चा

Foto
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी रविवारी बांगलादेशीय व पाकिस्तानी घुसखोरीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदारपणे पुनरागमन केले आहे. मनसेच्या या मोर्चाला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे ‘राज ठाकरे संपले’ अशी कोल्हेकुई करणार्‍यांना जबरदस्त चपराक बसली आहे. राज ठाकरे संपलेला नाही... संपणार नाही... हेच जणू हा मोर्चा सांगत होता. ‘विस्तव हा विस्तवच’ असतो. त्याच्यावर राख जमल्यामुळे काही काळ हा विस्तव निस्तेज झाल्यासारखे वाटेल परंतु त्यावर फुंकर घालताच राख दूर होईल, विस्तव तेजाळून उठेल, पेटून उठेल हेच हा मोर्चा जणू सांगत होता. या मोर्चाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत. प्रसार माध्यमेच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजच आज जवळजवळ दोन भागांत विभागला गेला असल्याचे राज ठाकरे यांंनी यावेळी सांगितले. त्या संदर्भात ते म्हणाले, केंद्र सरकारने एखादी चांगली कामगिरी केली आणि त्या कामगिरीचे कौतुक केले तर भाजपधार्जिणे समजले जाते आणि त्यांच्या एखाद्या धोरणाला विरोध दर्शविला तर भाजप विरोधकांच्या लाईनीत थेट उभे केले जाते. राज ठाकरे यांच्या म्हणण्यात अजीबात तथ्य नाही असे कोणालाही म्हणता येणार नाही. राज ठाकरे यांचे राजकारण शिवसेनेत सुरु झाले. त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचंड प्रभाव  आहे, हे कोणालाही अमान्य करता येणार नाही. घुसखोरांच्या विरोधात बेलभंडार उचलताना राज ठाकरे यांनी तलवारीला तलवार आणि दगडाला दगडाने उत्तर देण्याची केलेली भाषा त्यांना शोभणारी अशीच आहे. नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देताना त्यांनी या कायद्यातील दुरुस्तीचा बराच अभ्यास केलेला असावा असे त्यांच्या भाषणातून दिसत होते. जर भारतीय मुसलमानांना या कायद्यामुळे काहीही त्रास होणार नाही तर मग पाहून घेण्याची भाषा मुस्लीम मंडळी का करीत आहे, असा त्यांचा सवाल होता. याच मुद्याला धरुन त्यांनी ‘मोर्चाला मोर्चा, दगडाला दगड आणि तलवारीला तलवार’ अशी ललकारी दिली. राज ठाकरे यांचा हा मोर्चा मनसे सैनिकांना टॉनिक देणारा ठरणारा आहे. महाराष्ट्रातील तरुणांना राज ठाकरे आजही जवळचे वाटतात. यावर शिक्‍कामोर्तब करणारा हा मोर्चा होता. घुसखोरांची साफसफाई व्हायलाचा हवी. राज्य सरकारकडून अजीबात अपेक्षा नाही पण केंद्राने कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करुन या घुसखोरांना बाहेर काढून देश साफ करावा, भुसभुशीत जमिनीतच घुशी बिळे करतात. कडक जमिनीत नाहीत. त्यामुळे आता भारत सरकारने कडक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असे राज ठाकरे यांचे म्हणणे राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यासारखेच आहे. नागरिकत्व आणि एनआरसी विरोधात देशभरात निघत असलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून राज ठाकरे यांचा हा मोर्चा होता हे लक्षात घेतले तर हा मोर्चा आणि राज ठाकरे यांची बदलती भूमिका भाजपा आणि केंद्र सरकार यांना मोठा दिलासा देणारी आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. येथे पुन्हा राज ठाकरे यांनी मांडलेला तोच मुद्दा येतो की, एखाद्या चांगल्या निर्णयाचे स्वागत केले तर अशा प्रकारचा अर्थ त्यातून काढला जातो परंतु या गृहितकाला पर्याय नाही, असाच अर्थ काढला जाणार हेही तितकेच खरे आहे. मात्र त्यामुळे मनसेला वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच घुसखोरांविरुद्ध पहिल्यांदा आवाज उठवला होता. राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचे संस्कार ठळकपणे अधोरेखित करणारा मनसेचा हा मोर्चा होता. शिवसेनेला राज्यात बळ मिळाले ते मराठी माणसांमुळे नव्हे तर हिंदुत्ववादामुळे मिळाले हे नाकारण्यात अर्थ नाही. 1987-88 मध्ये शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली ‘रिडल्स’ प्रकरणी मुंबईत प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर वर्षभरात शिवसेना वार्‍यासारखी महाराष्ट्रभर पसरत गेली आणि 1988 च्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी निर्माण केलेल्या भगव्या वादळामुळे पहिल्याच प्रयत्नात औरंगाबाद महानगरपालिकेला गवसणी घालण्याचे सामर्थ्य सेनेला प्राप्‍त झाले, अशाच प्रकारचे सामर्थ्य या मोर्चातून मनसेला प्राप्‍त होऊ शकते, अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा फायदा राज ठाकरे कसे घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker