मुलाच्या ताब्यासाठी जावयावर हल्ला

Foto


छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मिल कॉर्नर भागातील पोलीस कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून एका सरकारी कर्मचाऱ्यावर त्याच्याच सासरच्या मंडळींनी चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी घरातून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही लंपास नेले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुस्ताक शेख (वय ३४) यांच्याकडे त्यांची सासू, साला व इतर नातेवाईक आले होते. मुलगा साद याला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर २० लाख रुपये द्या, अशी मागणी करत वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर फिर्यादीचा साला राज शेख याने चाकूने वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. तसेच इकबाल शेख यांनी लोखंडी रॉडने त्यांच्या पाठीवर व पायावर प्रहार केला. या गडबडीत आरोपींनी कपाटातील १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (नेकलेस, पत्ता, गोलमनी) जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीच्या आईलाही मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी राज शेख, नाजमिन शेख, इकबाल शेख यांच्यासह पाच जणांविरुद्ध बीएनएस कायद्यानुसार जबरी चोरी व जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक केदार या पुढील तपास करत आहेत.

https://epaper.sanjwarta.i Powered By: Vrudhee Solutions