कोरोनाचा मार अन् प्रभारीवर भार!

Foto
  •   जिल्ह्यातील रिक्‍त पदे
    • जिल्हाधिकारी
    • मनपा वैद्यकीय अधिकारी
    • जिल्हा आरोग्य अधिकारी
    • मनपा अतिरिक्‍त आयक्‍त 2 पदे
    • मनपा उपयुक्‍त 2 पदे
    • शहर अग्निशमन अधिकारी
    • मनपा कार्यकारी अभियंता
राज्यात कोरोना हॉट स्पॉट असलेल्या शहरात औरंगाबादचा समावेश होतो. या छोट्या शहराने मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सारख्या शहरासोबत कोरोना संसर्गाची शर्यत लावली. त्यातच मनपा तसेच जिल्हा प्रशासनातील अनेक महत्वाची पदे रिक्‍तअसल्याने शासकीय यंत्रणा पंगू बनली. आता तर थेट जिल्हाधिकार्‍यांचेच पद रिक्‍त झाले आहे. कोरोना संकट काळात आणि स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव या सारख्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे पद रिक्‍त असणे चिंतेची बाब नक्कीच आहे.
कोरोना संसर्गाच्या बाबतीत राज्यातील महानगरांशी स्पर्धा करणारे औरंगाबाद शहर चांगलेच प्रकाश झोतात आले. मे, जून आणि जुलै हे तीन महिने कोरोनासाठी पिक पिरेड मानले गेले. याच काळात प्रशासनातील समन्वयामुळे संसर्ग वाढल्याचा आरोप या काळात झाला. राजकीय नेत्यांनी अधिकार्‍यावर टीकास्त्र सोडले. तब्बल दोन आठवडे गोंधळाची स्थिती होती. दुसरीकडे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रशासनावर अंकुश राहिला नाही. त्याचा थेट फटका शहरवासियांना बसला. प्रभावी अधिकार्‍यांवर कारभार असल्याने प्रशासकीय समन्वय आणि कामकाजाच्या वेगावर ही मर्यादा आल्या. परिणामी शहर कोरोना संसर्गाच्या गर्तेत ढकलले गेले.
गेल्या चार महिन्यांपासून शासकीय यंत्रणा कोरोनाशी निकाराचा लढा देत असताना मनपातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद रिक्त आहे. सध्या डॉ. नीता पाडळकर या प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. शहरात संसर्ग टिपेला पोहोचला असताना मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी पदच शासनाने भरले नाही. जिल्ह्याची अवस्थाही तशीच आहे. एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून शासनाने हे पद भरले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा कारभार प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या खांद्यावर आहे. महामारीने थैमान घातले असताना शहर आणि जिल्ह्याची ही प्रमुख पदे शासनाने भरली नाहीत. दुसरीकडे मनपात 2 अतिरिक्त आयुक्त, 2 उपायुक्त तसेच अग्निशमन अधिकार्‍यांचे एक पद अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. आता तर जिल्हाधिकार्‍यांनी सारखे सर्वोच्च पद रिक्त झाले आहे.
जिल्ह्याचा भार प्रभारींवर!
शहरानंतर आता ग्रामीण भागालाही संसर्गाने वेढा घातला आहे. गेल्या महिनाभरापासून तर शेकडोंच्या संख्येने रुग्ण  ग्रामीण भागात आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत मुख्य आरोग्य अधिकार्‍यांची पदे भरली गेलेली नाहीत. जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा भारही प्रभारी अधिकार्‍यांवर आहे. मध्यंतरी सोयगावच्या तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांकडे हा पदभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर ते होम   क्‍वारन्टाईन झाले. जिल्हा अधिकारी आरोग्य अधिकार्‍याचा पदभार घेण्यासाठी कोणीही इच्छुक नव्हते. अखेर सीईओ मंगेश गोंदावले यांनी मन परिवर्तन करीत डॉ. उल्हास गंडाळ यांच्याकडे पदभार सोपवला. आरोग्य यंत्रणेची अशी स्थिती असताना कोरोनाशी कसा लढा देता येईल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मनपा आयुक्‍त ही वेटिंग वर!
दरम्यान आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा सिलसिला अजून काही दिवस सुरू राहणार असल्याचे समजते. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी यापूर्वी बदलीसाठी प्रयत्न केल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या पाठोपाठ मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे ही वेटिंग वर असल्याची चर्चा आहे. महत्वाची पदे रिक्त असल्याने महामारीच्या काळातच प्रशासकीय यंत्रणा अस्थिर असणे चांगले लक्षण नाही, एवढे मात्र नक्की!
शहराचे आरोग्यही प्रभारींवर
शहरात संसर्ग टिपेला पोहोचला असताना शासनाला मनपा मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद भरता आले नाही. गेल्या वर्षभरापासून कारभार प्रभारीकडे सोपवण्यात आला आहे. नियमित अधिकारी नसल्याने प्रशासनात येणारी मरगळ अडचणीची ठरते आहे. सध्या डॉक्टर नीता पाडळकर या प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. शासनाने तातडीने वैद्यकीय अधिकार्‍याचे पद भरावे अशी मागणी मनपाने यापूर्वीच केलेली आहे.
अतिरिक्त आयुक्‍त हवेत
मनपातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे अजूनही रिक्त आहेत. त्याचबरोबर दोन उपायुक्तांची पदेही रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांचे पदही रिक्त आहे. शहराचा विस्तार पाहता हे पद तातडीने भरणे आवश्यक आहे. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून शासनाने हे पद भरलेले नाही. विशेष म्हणजे कोरोना संकटाच्या काळात मनुष्यबळ अपुरे असताना हीच महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकार्‍यांवर मोठा ताण येत असल्याचे बोलले जाते. एकाच अधिकार्‍याकडे अनेक विभागाची कामे दिल्याने त्याचा फटका दैनंदिन कामकाजावर बसतो यात शंका नाही.
 ऐन गणेशोत्सव काळात
दरम्यान जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीचे आदेश काल निघाले. त्यामुळे जिल्ह्यात सर्वोच्च असलेले पदही रिक्त झाले आहे. स्वातंत्र्य दिन, गणेशोत्सव यासारखी महत्त्वाचे उत्सव समारंभ याच काळात आहेत. ग्रामीण भागात संसर्गाचा वेग वाढत असताना जिल्ह्याचा भार प्रभारींवर असणे यंत्रणेसाठी धोकादायक आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker