ऊर्जा खात्यातील नियुक्त्यांमुळे

Foto
महाआघाडीतील बेबनाव उजेडात
राज्याच्या महाआघाडी सरकारमधील तीन पक्षाचे त्रांगडे काही केल्या सुटत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या खात्यात केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याच्या नाट्यावर पडदा पडत नाही तोच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्याच्या खात्यांतर्गत वीज कंपन्यांवर अशासकीय सदस्यांच्या परस्पर नियुक्त्या करून टाकल्यामुळे महाआघाडीतील नाराजी पुन्हा एकदा उजेडात आली आहे. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या वादग्रस्त बनत असल्याचे दिसताच प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तत्परता दाखवित या नियुक्त्यांबाबत फेरविचार  करण्याची तयारी दर्शविली आहे.
ऊर्जा खात्यामधील नियुक्त्यांवरुन महाविकास आघाडीत नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांचा फेरविचार केला जाईल असे सांगितले आहे. परस्पर केलेल्या नियुक्त्यांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी ही माहिती एबीपीशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी सरकार तीन पक्षांचे असल्याने सर्वांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जावा असेही सांगितले.
तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घेत नियुक्त्त्या झाल्या पाहिजेत. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. काही गोष्टी घडत असतात. काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणे योग्य नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी सारथी काँग्रेसकडे राहिलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे असेही म्हटले. तसेच मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवण्यात आलं आहे अशी माहिती दिली.
निधी वाटप सर्व आमदारांना समान लेखून केले पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. हे शिवसेना, राष्ट्रवादीच्याही आमदारांचे म्हणणे आहे. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. सरकार चालवताना या गोष्टी होत असतात. चर्चा केली जाते, धोरणे ठरवली जातात. काही समस्या आल्या तर त्यातून मार्ग काढत असतो, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. दरम्यान परस्पर केलेल्या नियुक्त्यांवरील वादानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker