अर्धा महाराष्ट्र जलमय

Foto
 सलग तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय कोकणातील ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग व पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, विदर्भातील चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यातही धुवाँधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आले आहेत. गतवर्षी पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणातील अनेक गावांमध्ये नद्यांचे पाणी शिरले होते. त्या पार्श्‍वभूमीवर यावेळी प्रशासनातर्फे दक्षता बाळगत आज विविध जिल्ह्यात एनडीआरएफच्या 16 तुकड्या रवाना केल्या. तर नद्यांच्या काठावर राहणार्‍यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
बुधवारी पावसाने मुंबईला झोडपल्यानंतर आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने मुंबई जलमय झाली आहे. रस्ते तसंच रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आले आहेत. दरम्यान पेडर रोड येथे भूस्खलन झाले आहे. बुधवारी रात्री पेडर रोड येथे जमीन खचली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसेच पेडर रो़डवर पडलेले झाडही हटवण्याचं काम सुरु आहे.
मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून गेल्या चार तासात 300 मिमी पाऊस झाला असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. मुंबईत काल विक्रमी पावसाची नोंद झाली असून आपण याआधी इतका पाऊस कधीच पाहिला नव्हता असे इकबाल चहल यांनी म्हटलं आहे. दरम्यान जे जे रुग्णालयात शिरलेले पाणी पंप लावून बाहेर काढण्यात आले असून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याची माहिती इकबाल चहल यांनी दिली आहे.
कोल्हापुरात 102 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या पाणी 43 फुटांवरून वाहत आहे. यामुळे प्रयाग चिखली आंबेवाडी येथील लोकांचे स्थलांतर सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे 40 पेक्षा अधिक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही गावात पुराचे पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखल झाली आहेत. नदीला वाढलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 102 बंधारे सध्या पाण्याखाली गेली आहेत.
नद्यांना पूर 
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील बाव नदीला महापूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. तसेच जिल्ह्यातील मुचकुंदी, वशिष्ठा, सोनवी, काजळी, कोरपली, शास्त्री या नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे ओसंडून वाहत आहे. पंचगंगा नदीला पूर आला आहे. गगन बावडा येथे गेल्या 24 तासात 310 मि.मी. पाऊस पडला. तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील, सावित्री नदी, जगबुडी नदी, रोहा तालुक्यातील कुंडलिका, अंबा नद्यांना पूर आला आहे.
दत्त मंदिरात शिरले पाणी
नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पाणी पोहोचले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अनेक नद्यांमध्ये वाढत असलेल्या पाण्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर ते गगनबावडा या रस्त्यावर पाणी आल्यामुळे या मार्गावरून कोकणात जाणारा रस्ता बंद झाला आहे. याशिवाय निपाणी आजरामार्गे गोव्यात जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. केर्ले ते केर्ली या रस्त्यावर पाणी आल्यामुळे रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. पाणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker