कोरोना लढाईसाठी भारताला मिळाली अत्याधुनिक इस्रायली उपकरणे

Foto
 देशाला संरक्षण शस्त्र पुरविणारा महत्त्वाचा देश इस्रायल आता आरोग्य क्षेत्रातील मदतीसाठीही धावून आला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी इस्रायलने भारताला आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर आधारीत असलेल्या स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी आणि उपकरणे दिल्याची माहिती इस्रायली दूतावासाने दिली. ही आधुनिक उपकरणे दिल्लीतील एम्सला देण्यात आली असून यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मोठे बळ मिळणार आहे.
भारतातील इस्रायलच्या दूतावासाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. या अत्याधुनिक उपकरणांमुळे एम्सला केवळ कोरोनाविरुद्धच्या लढाईत उपयोग होईल असे नाही, तर यामुळे एकूणच आरोग्याच्या सुविधांमध्ये देखील सुधारणा आणि वाढ होणार आहे. ही उपकरणे प्रदान करताना भारतातील इस्रायलचे राजदूत डॉ. रॉन मलका यांच्याव्यतिरिक्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया हे देखील उपस्थित होते.  एम्ससोबत आमची भागीदारी गेल्या एक दशकापासून सुरू असल्याचे इस्रायलच्या दूतावासाने म्हटले आहे. सन 2007 मध्ये एम्सचे वरिष्ठ डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या एका प्रतिनिधी मंडळाने इस्रायलचा दौरा केला होता. तेथे त्यांनी ट्रॉमा आणि मास कॅज्युअल्टीवर प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणाचे आयोजन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डिव्हेलपमेंट कॉर्पोरेशनने केले होते.
भारत आणि इस्रायल दरम्यान बैठक
कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत एकत्रितपणे व्यापक स्वरुपात लढण्यासाठी परस्पर संबंध वृद्धिंगत व्हावेत या उद्देशाने भारत आणि इस्रायलने 25 मे रोजी एक बैठक घेतली होती. या बैठकीत संयुक्त संसाधने आणि विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे या बैठकीनंतर इस्रायलच्या दूतावासाने म्हटले होते. हे भारत आणि इस्रायल दरम्यान व्यापक स्तरावर वैज्ञानिक सहयोगाअंतर्गत उचललेले पाऊल असल्याचेही दूतावासाने म्हटले होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker