मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना पावसाने झोडपले !

Foto
१४ मंडळात अतिवृष्टी : हसनाबादेत सर्वाधिक १२९ मिमी
गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पावसाने काल मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळला. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ११ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळात सर्वाधिक १२९.७५ मिमी पावसाची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतली आहे.
 एक जून पासून सुरू झालेला पाऊस अजूनही थांबायचे नाव घेत नाही. गेल्या चार-पाच वर्षात पहिल्यांदाच मृग नक्षत्रात सर्वत्र खरीप पेरणी आटोपली. त्यानंतरही सलग चांगला पाऊस सुरू असल्याने पिकांची जोमदार वाढ झाली आहे. जून महिन्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीच्या २०० टक्के पाऊस कोसळला होता. त्यानंतर आता एक जुलैपासून पुन्हा एकदा दमदार पावसाने प्रारंभ पावसाला प्रारंभ झाला आहे. या महिन्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात काहीसा कमी पाऊस पडला तरी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे आकडेवारी सांगते. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर कमी राहिला. मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला आहे. विशेष म्हणजे पिकांच्या मशागतीनंतर आवश्यक  असलेला पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 तीन जिल्ह्याला झोडपले !
दरम्यान काल रात्री मुसळधार पावसाने मराठवाड्यातील तीन जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. सर्वाधिक ४२.७ मिमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात झाला. त्या खालोखाल बीड २६.३ जालना २४.४ मिमी पाऊस कोसळला. लातूर ९.२ मिमी, उस्मानाबाद ९.९, नांदेड ९.८, परभणी ८.५, आणि हिंगोली ६.८ मिमी या पाच जिल्ह्यात मात्र किरकोळ पावसाची नोंद झाली आहे.
 जिल्ह्यातील तब्बल अकरा मंडळात अतिवृष्टी !औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन महिन्यातील दुसरा सर्वात मोठा पाऊस काल कोसळला. त्याचबरोबर वैजापूर तालुक्यातील आडगाव मंडळात तब्‍बल ११८ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल कन्नड तालुक्यातील करजगाव मंडळात ९९ मिमी, आळंद (ता. फुलंब्री ८१.२५) अजिंठा ८१, गंगापूर -वाळूज ७४.५०, पिशोर ७६.५०, चिकलठाणा (कन्नड) ७३,  वैजापूर ६९.७५,  सिल्लोड ६८.२५ मिमी या अकरा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
 हसनाबाद मंडळात आभाळच कोसळले !
दरम्यान, भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मंडळात मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.  अवघ्या तीन चार तासात हसनाबाद मंडळात १२९.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील धारूर मंडळात १२६.५० मिमी एवढा पाऊस कोसळला. तर अंबड तालुक्यातील गोंदी मंडळामध्ये ९०.२५ मिमी पाऊस पडल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker