शिवसेनेबरोबर घरोबा करण्यास तयार

Foto
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे वक्‍तव्य स निवडणुका मात्र स्वतंत्रपणे
महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेबरोबर येण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिपादान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. सत्तेमध्ये एकत्र आलो तरी निवडणुका मात्र एकत्रित लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री पदासंदर्भात छेडले असता त्यांनी शिवसेनेने अवाजवी मागू नये, असे म्हणताना भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 आमदार असल्याचे सांगितले. भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे, असे स्पष्ट करतानाच शिवसेना सध्या हवेत आहे, त्यांना स्वर्ग दोन बोटे उरलेले आहे, अशीही पुष्टी जोडली.
महाराष्ट्रातील तीन पक्षाच्या आघाडी सरकारमुळे राज्याचे भवितव्य सुरक्षित राहिलेले नाही. तिन्ही पक्षांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहे, कोणाला कोणाशी मेळ नाही. त्यामुळे राज्याची जबरदस्त पिछेहाट सुरू आहे, या पार्श्‍वभूमीवर राज्याचे हित लक्षात घेऊन आम्ही शिवसेनेबरोबर जाण्यास तयार आहोत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भाजपचे सध्या 105 आमदार आहेत तर शिवसेनेचे 56 आमदार आहेत, अशा परिस्थितीत शिवसेनेने अवाजवी मागू नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्‍त केली. एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. जास्त जागा असतानाही आम्ही मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले तर देशभरात आम्हाला त्याचा फटका बसू शकतो. महत्त्वाच्या खात्यासंदर्भात मात्र तडजोड होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. सध्याचे महाआघाडीचे सरकार लवकरात लवकर सत्तेवरून जाणे महाराष्ट्रासाठी हितकर ठरणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.
निवडणुका मात्र स्वतंत्रपणे 
शिवसेनेबरोबर एकत्र आलो तरी निवडणुका मात्र स्वतंत्रपणे  लढविण्यावर चंद्रकांत पाटील यांनी भर दिला. ते म्हणाले युती करून निवडून यायचे आणि नंतर वेगळेच रंग दाखवायचे त्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊन सरकार स्थापनेसाठी युती, आघाडी करणे हे केव्हाही चांगले. त्यामुळे मिळालेल्या धड्यातून आम्ही ही बाब शिकलो आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही निवडणुकीत महाराष्ट्रात तरी आम्ही स्वतंत्रपणे 288 जागांवर निवडणुका लढविणार आहोत. दरम्यान या संदर्भात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याची प्रतिक्रिया आली नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker