कृषी विधेयकावरुन हिंसक आंदोलन

Foto
दिल्‍लीत आंदोलनाचा भडका
 इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवले 
बंदोबस्तात वाढ
 कृषी विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी सकाळी नवी दिल्लीत इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. राजपथवर कृषी विधेयकावरुन आंदोलन सुरु असताना पंजाब युवक काँग्रेसच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. 
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरुन देशभरात आंदोलन सुरु आहे. सकाळी सात वाजून 42 मिनिटांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 
लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये शेतकर्‍यांशी संबंधित विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाली. यातील कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक 2020 ही विधेयके राज्यसभेत देखील मंजूर झाली. या विधेयकांना देशभरातल्या शेतकरी संघटना याला विरोध करत आहेत.
इंडिया गेटवर 15 ते 20 जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. आग विझवण्यात आली असून, ट्रॅक्टर तिथून हटवण्यात आला आहे. जे यामध्ये सहभागी आहेत, त्यांची ओळख पटवण्यात आली असून तपास सुरु आहे असे नवी दिल्लीच्या डीसीपींनी सांगितले. आठवडयाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणार्‍या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. दुसरीकडे, शेतकर्‍यांसाठी हा ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली. कृषी विधेयकावरुन मतभेद झाल्यामुळे शिरोमणी अकाली दलने शनिवारी रात्री उशिरा एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा एकप्रकारचा झटका आहे. कारण मागच्या 22 वर्षांपासून हा पक्ष भक्कमपणे भाजपासोबत होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विश्वसनियता उरलेली नाही. एनडीए फक्त नावाला आहे अशा शब्दात शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी रविवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
राष्ट्रपतींची मंजुरी मिळणे अत्यंत दुर्देवी - सुखबीर बादल 
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांनी कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी मिळणे अत्यंत दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, हा देशासाठी एक काळा दिवस आहे. राष्ट्रपतींनी देशाच्या भावनेकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही अपेक्षा करत होतो की राष्ट्रपती पुन्हा ही विधेयके संसदेत पाठवतील, मात्र तसे झाले नाही, असं ते म्हणाले. पंजाब हरियाणासह अनेक राज्यांमध्ये या विधेयकांवरुन शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker