सिल्लोड, (प्रतिनिधी) : नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीलेश अपार यांनी दिली.
तहसील कार्यालयातील बैठकीनंतर मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बैठकीला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी कारभारी दिवेकर, तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सतिष सोनी यांची उपस्थिती होती. नगर परिषद निवडणुकीसाठी ६१ मतदान केंद्र राहणार आहेत. ५४ हजार ८०८ मतदार मतदानाचा हक्क बजा-वणार आहेत. यामध्ये २८ हजार २७६ पुरुष, २६ हजार ५२९ महिला, तर ३ इतर मतदार आहेत. मतदार यादीत १ हजार १०२ दुबार मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दुबार मतदाराचे एकाच ठिकाणी मतदान व्हावे, यासाठी ओळख पटवून हमीपत्र भरून घेणार आहे. दिव्याग मतदारांसाठी निवडणुकीत त्यांना त्रास होऊ नये म्हणून सुविधा देणार आहे.
शहराताल चार रस्त्यांवर चार बैठे पथक नियुक्त केले आहे. तीन फिरत्या पथकाची नियुक्ती केली असल्याची माहिती नीलेश अपार यांनी या वेळी दिली. २ डिसेंबरला सकाळी ७. ३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. तहसील कार्यालयात निवडणुकीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेला आहे. तर स्वतंत्र कक्षात उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहे.












