नीट पेपर घोटाळ्यामध्ये मोठी टोळी !! होय, मी पेपर फोडला, मनीषा हवालदारची सीबीआयकडे धक्कादायक कबुली, एनटीएच्या अधिकार्‍याच्या नावही सांगितले

Foto
 पुणे: संपूर्ण देशात खळबळ उडवून देणार्‍या  पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अटकेत असलेल्या आरोपी मनीषा हवालदार हिने सीबीआयच्या चौकशीत आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यांनी पेपर फोडल्याची कबुली दिली आहे. शिवाय कुणाच्या सांगण्यावरून आपण पेपर फोडला, त्याचा खुलासा देखील केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील म्होरक्याचं नाव आता सीबीआयच्या हाती लागलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण नीट परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नीट परीक्षा आयोजित करणार्‍या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पॅनलमधीलच एका उच्चपदस्थ अधिकार्‍याच्या सांगण्यावरून आपण प्रश्नपत्रिका फोडल्याची धक्कादायक कबुली मनीषा हवालदार हिने दिली आहे. या कबुलीमुळे आता थेट परीक्षा घेणार्‍या संस्थेचेच अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात आले आहेत.

मनीषा हवालदारने सीबीआयसमोर दिलेल्या जबाबात स्पष्ट केलं आहे की, तिने परीक्षेच्या आधीच अनेक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळवून दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, हे गोपनीय प्रश्न तिने मनीषा मांढरे नावाच्या दुसर्‍या एका महिलेला थेट व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले होते. मनीषा हवालदार ही मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोन्ही संशयितांच्या सतत संपर्कात होती आणि त्यांच्यात व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर फुटीबाबत अनेकदा सविस्तर चर्चा झाली होती.

पुरावे नष्ट करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स केले डिलीट!
सीबीआयच्या हाती पुरावे लागू नयेत म्हणून मनीषा हवालदारने अत्यंत चलाखीने तिच्या मोबाईलमधील सर्व संशयास्पद व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि डेटा डिलीट केला होता. मात्र, सीबीआयच्या सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गुन्ह्याचा सुगावा लागताच सीबीआयच्या पथकाने मनीषा हवालदार हिच्या घरावर छापा टाकला होता. या छापेमारीत सीबीआयच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. तिच्या घरातून भौतिकशास्त्र विषयाच्या अनेक मूळ आणि संशयास्पद प्रश्नपत्रिका, लॅपटॉप, मोबाईल आणि ६० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांमधून आणखी किती विद्यार्थ्यांना पेपर पुरवला गेला, याची यादी मिळण्याची शक्यता आहे.

त्या  अधिकार्‍याचा शोध सुरू
मनीषा हवालदारच्या या खळबळजनक कबुलीनंतर सीबीआयने आता आपले लक्ष मुख्य सूत्रधाराकडे वळवले आहे. एनटीए पॅनलमधील ज्या अधिकार्‍याने मनीषाला पेपर फोडण्यास सांगितले, त्याचा शोध घेण्यासाठी सीबीआयची पथकं रवाना झाली आहेत. या बड्या अधिकार्‍याला अटक केल्यानंतर देशव्यापी  पेपर फुटीच्या रॅकेटचं धागेदोरे पूर्णपणे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआयकडून या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे.