मुंबई झाली पुन्हा तुंबई

Foto
रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद 
24 तासात मुसळधार पावसाची शक्यता  
कार्यालयांना दिली सुट्टी
 मुंबई शहरासह उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी संध्याकाळपासूनच बरसणार्‍या पावसामुळे मुंबईतील अनेक सखले भागांत पाणी साचलं आहे. तसेच येत्या 24 तासांतही मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. तर वरळीच्या बीएमसी क्वॉर्टसमध्ये पाणी शिरल. मुंबईप्रमाणेच कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. अशातच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
आज बुधवारी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयांना सुट्टी देण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तर पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहयला मिळत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ट्विटरच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे की, ’भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टी च्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.’
मुंबई मधील परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी, मालाड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनाही नदीचं रूप आलं आहे. अंधेरी येथील सब वेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे भरलेल्या पाण्यात काही रिक्षा वाहून आल्या तर बेस्टची बस देखील अडकून पडली होती. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी धावणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. कारण मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर दोन ते तीन फूट पाणी साचलं आहे. सायन रेल्वे स्थानकांतील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. अशाच प्रकारे सखल भागात असलेल्या रेल्वे स्थानकांवर देखील पाणी भरले आहे. सध्या लोकडाऊनमुळे सामान्य प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसला तरी अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांसाठी मात्र लोकल सुरू आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker