हर्सुल तलावावर राजकीय भरती; जल पूजनाचा आटापिटा!

Foto
गेले दशकभर वाळू माफिया, मुरूम व माती चोरांचा अड्डा बनलेल्या हर्सूल तलावाकाठी यंदा राजकीय भरती आली आहे.  शिवसेना नेत्या पाठोपाठ भाजप नेत्यांमध्येही आता जल पूजनाची चढाओढ लागली असून मंगळवारी भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी तर आज माजी नगरसेवक पुनम बामणे यांनी जलपूजन केले. दुसरीकडे तलाव  ओसंडून वाहत असल्याने चक्क पर्यटन स्थळ बनला आहे. भरभरुन वाहणार्‍या तलावाला डोळ्यात साठवण्यासाठी अनेकजण फेरफटका मारताना दिसतात. 
तब्बल दशकभर कोरड्याठाक पडलेल्या हर्सूल तलाव यंदा तुडुंब भरला आहे. या तलावातून शहरातील जवळपास बारा वार्डाना पाणीपुरवठा होतो. शहर सलग चार-पाच वर्ष पाणीटंचाईच्या खाईत असताना तलावही पावसाअभावी भरला नव्हता. त्यामुळे तलावावर कायम वाळू, माती आणि मुरूम माफियांचा राबता दिसून आला. यावर्षी मात्र चांगल्या पावसाने पहिल्या दोन महिन्यातच तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
दरम्यान तलाव भरताच राजकीय नेते मंडळीमध्ये जल पूजनाची स्पर्धाच लागल्याचे दिसते. सोमवारी 3 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांनी सकाळीच जल पूजनाचा कार्यक्रम घेतला. दोघांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतल्याने शहरात एकच चर्चा रंगली.
पर्यटन स्थळही!
यंदा चांगल्या पावसाने नदी नाल्यांना पाणी खळखळू लागले आहे. डोंगरदर्‍यातून झुळझुळ वाहणारे पाणी पाहण्यासाठी शहरातील उत्साही पर्यटक भटकंती करीत आहेत. हर्सूल तलावही ओसंडून वाहू लागला आहे. काठोकाठ भरलेला तलाव पाहण्यासाठी अनेक जण तलावावर धाव घेत असल्याचे दिसते. त्यामुळे हा तलाव पर्यटन स्थळ बनला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker