सिल्लोड, (प्रतिनिधी): दोन वर्षांपासून अतिवृष्टी आणि जमिनी खरडून गेल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप हक्काचे अनुदान मिळालेले नाही. या गंभीर प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यक्षेत्र प्रमुख सागर सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली १८ फेब्रुवारी रोजी सोयगावच्या तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. मात्र, नेहमीप्रमाणे तहसीलदार कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त भावना व्यक्त करत नायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
तहसीलदारांच्या अनुपस्थितीवर संताप निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला तहसीलदार कार्यालयात मिळून आले नाहीत. तालुक्याचा बाप म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार वारंवार कार्यालयातून गायब असतात, मग शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा कोणाकडे मांडायच्या? असा संतप्त सवाल सागर पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. तहसीलदारांच्या या अनुपस्थितीबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली.
--- प्रलंबित अनुदानावर प्रशासनाला धारेवर धरले ---
यावेळी बोलताना सागर पाटील म्हणाले की, २०२४ मधील अतिवृष्टीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात का आले नाही? आणि च्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा. जर बँका व्याजासाठी शेतकऱ्यांच्या मागे लागतात, तर मग शासनाने रखडलेल्या अनुदानावर १२% व्याज का देऊ नये?
अनेक सरपंचांची उपस्थिती या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील अनेक लोकप्रतिनिधींनी याला पाठिंबा दिला.
यावेळी नितीन अण्णा (उपसरपंच, वाडी सुतांडा), मुरलीबापू (सरपंच, बनोटी), अनिल सोळंके (सरपंच, वरठाण), रमेश चौधरी (माजी उपसरपंच, बनोटी) यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-- आंदोलनाचा इशारा --
प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, या कालावधीत जर २०२४-२५ मधील अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही, तर सोयगाव तहसील कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.













