वैजापूर कृउबा समितीची डिझेल टंचाईमुळे कांदा खरेदी बंद

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी डिझेलटंचाईमुळे कांदा खरेदी आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता झाली आहे.

वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने व्यापारी आणि हमाल संघटनांनी बाजारातील व्यवहार थांबविण्याचा निर्णय
घेतला आहे. कांदा खरेदी बंद ठेवण्यात यावी, असे पत्र बाजार समितीला दिल्याने कांदा खरेदी आजपासून बंद आहे.

 वैजापूर बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्रावर जवळपास ७ हजार क्विंटलपर्यंत कांदा खरेदी करण्यात येते. बाहेर राज्यात हा कांदा व्यापारी विक्रीसाठी पाठवतात. ६५ व्यापारी कांदा खरेदी करतात. कांदा खरेदी बंद या निर्णयाचा थेट परिणाम कांद्याच्या दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सध्या अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कांद्याचा साठा असून, बाजार बंद राहिल्यास मालाची आवक थांबेल आणि व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच उत्पादन खर्च वाढ, अनियमित पाऊस आणि साठवणुकीच्या समस्यांमुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.