गर्दी टाळा गुन्हे टाळा !

Foto
औरंगाबाद : कोरोना विषाणूशी आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. शहर सध्या पहिल्या टप्प्यात असल्याने घाबरण्याचे कारण नाही. तरीही प्रतिबंधात्मक आदेश म्हणून गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. शहरवासीयांनी साथ द्यावी, आदेशाने उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करू असा निर्वाणीचा इशाराच जिल्हाधिकारी उदय चौधरी पत्रकार परिषदेत यांनी दिला. त्याचबरोबर शहराची चारही बाजूंनी नाकेबंदी करण्यात येणार असल्याचा ते म्हणाले.
शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या राष्ट्रीय आपत्तीशी लढण्यास जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मनपाकडून युद्धस्तरावर उपाययोजना राबविल्या जात असून पुढील 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत जवळपास 2 हजार 906 लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. यात मध्यवर्ती बसस्थानकावर 636, सिडको बस स्थानक 247,  रेल्वे स्थानक 500, नगर नाका 428 येथे लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. आतापर्यंत चार जणांना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरात 250 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एमआयडीसीचे वस्तीगृह, एमटीडीसीचे हॉलिडे कॅम्पस, देवगिरी महाविद्यालयाचे वस्तीगृह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे जिल्हाधिकारी म्हणाले. शासकीय कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना कार्यालयात येऊच नका, असे आवाहन केले आहे. ई-मेल व्हाट्सअप वर तक्रार दाखल केली तर तातडीने निपटारा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे ते म्हणाले. महसूल विभाग वगळता इतर विभागातील कर्मचार्‍यांना एक दिवस आड येण्याचे नियम लावून देण्यात आले. त्यामुळे 50 टक्के कर्मचारी उपस्थिती कमी होणार आहे.
तर थेट गुन्हे दाखल करणार
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बाजारपेठांमध्ये ही नागरिकांनी गर्दी करू नये. बाजारपेठ बंद करण्याबाबत व्यापारी महासंघाने निर्णय घेतला आहे. आदेश देऊनही रस्त्यावर गर्दी असून येते अशा परिस्थितीत आता थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला. धार्मिक स्थळांनाही बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार मंदिर, मशीद, प्रार्थना गृह , चर्च बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता पानटपरी, रेस्टॉरंट यांच्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.
शहराची चारही बाजूंनी नाका-बंदी
शहरात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. विमानतळावर स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याच बरोबर रेल्वे स्टेशन, बस स्थानकावरही स्क्रिनिंग सेंटर सुरू करण्यात आले.  आता रस्ता मार्गाने येणार्‍या चारही दिशांना सील करण्यात येणार आहे. नगर टोल नाक्यावर स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्यात आले तेथे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर केंब्रिज रस्त्यावरही स्कॅनिंग करण्यात येत आहे. हर्सूल सावंगी परिसरातही लवकरच येणार्‍या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. एकंदरीत शहरात येणार्‍या प्रत्येक प्रवाशाचे स्क्रिनिंग करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शहराची नाकेबंदी करण्यात येईल असे ते म्हणाले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker