ब्रह्मगव्हाण योजनेचे पाईप सडले नव्हे तर विरोधकांचे डोके सडके : फलोत्पादन मंत्री भुमरे

Foto
पैठण : ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे पाईप सडलेले नसून विरोधकांचे डोके सडके असल्याची टीका राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी केली.
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची चाचणी (टेस्टिंग) फलोत्पादनमंत्री भुमरे यांच्या हस्ते सोमवारी घेण्यात आली. यावेळी
अधीक्षक अभियंता महेंद्र सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, नवनाथ पिसुटे, महेश देशमुख, नंदअण्णा काळे, सोमनाथ परदेशी, विजय गोरे आदी उपस्थित होते.
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा मार्गी लागत असून, तालुक्यातील 55 गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न  कायमस्वरूपी मिटणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी रखडलेली ही योजना आता मार्गी लागत असतानाच पाईपलाईन सडके व जुने टाकले असून, पाईपलाईला गळती लागली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मंत्री भुमरे यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. या योजनेचे काम गतीने होत आहे ते विरोधकांना दिसत नाही, त्यांचे डोके सडले आहे, अशी टीका करत या पंधरा दिवसात मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन करणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 222 कोटी रुपयांच्या या योजनेला मंजुरी दिली. आजपर्यंत 214 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुढील कामासाठी आणखी निधीची गरज लागणार आहे, असे भुमरे म्हणाले. दरम्यान, सोमवारी ब्रह्मगव्हाण योजनेची चाचणी होऊन पाणी सुटल्याने शेतकर्‍यांनी पेढे वाटून आनंद व्यक्‍त केला.
या योजनेमुळे पैठण तालुक्यातील 55 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार असून, तालुक्यातील 14 हजार 582 हेक्टर शेतीला फायदा होणार असल्याचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे  यांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker