शिवरायांच्या जयजयकाराने शहर दुमदुमले

Foto
जिल्ह्यातील 76 शिव पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी  ढोल पथक-लेझीम पथकाने आणली रंगत
औरंगाबाद : बरोबर अकरा वाजेची वेळ... क्रांती चौकातील शिव पुतळ्यासमोर हजारो शिवप्रेमींची झालेली गर्दी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजीचा गजर... तेवढ्यात आकाशातून हेलिकॉप्टरने शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाते हे अलोट उत्साहाचे दर्शन आज क्रांतिचौकात घडले. यावेळी  शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार,  आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, संयोजक विनोद पाटील, आ. सतीश चव्हाण, महापौर नंदकुमार घोडेले, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेवराव पवार, माजी आ. कल्याण काळे, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, राजू काका शेळके, नगरसेवक राजू वानखेडे, मनोज पाटील, नगरसेवक राजू शिंदे, राजगौरव वानखेडे आदींची उपस्थिती होती.
 छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरातील प्रत्येक चौकात, रस्त्यावर असाच अभूतपूर्व उत्साह  दिसून आला. रस्ते दुचाकी रॅली, ढोल पथकांचा दणदणाटाने गजबजून गेले होते. औरंगाबाद जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने क्रांती चौकात भव्य शिवप्रतिमा साकारण्यात आली. रायगडाच्या प्रतिकृती समोर उभारलेल्या या  प्रतिमेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. क्रांती चौकात सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात शिवप्रेमीचे आगमन होत होते. डोक्याला भगवे फेटे, हातात भगवे ध्वज घेतलेले शिवप्रेमीच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय जिजाऊ.. जय शिवराय...जय भवानी जय शिवाजी... अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भारतीय कामगार सेनेच्या वतीने दौलताबाद येथून शिवज्योत आणण्यात आली. या शिवज्योतीचे स्वागत महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. यावर्षी एक राजा... एक जयंती... तसेच महिला संरक्षण या विषयावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.
 ढोल- लेझीम पथकाने आणली रंगत !
 क्रांतिचौकात ढोल पथकांनी सुरेख प्रदर्शन केले. शिवभक्त मित्र परिवार बजाज नगरच्या ढोल पथकाने उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः महिलांच्या ढोल पथकांनी दाद मिळवली. ढोल पथकात सहभागी वादकांनी भगवे फेटे परिधान केले होते तर काहींच्या हातात उंच भगवा ध्वज होता. ज्ञानदीप शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने सुंदर सादरीकरण केले. या ढोल पथक तसेच लेझीम पथकाला उपस्थितांनी दाद दिली.
 दरम्यान जिल्हा शिवजयंती उत्सव समितीतर्फे क्रांती चौकात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. या ठिकाणी महोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भव्य व्यासपीठ उभारले होते. संभाजी ब्रिगेड, शिवशक्ती-भीमशक्ती यासह अनेक पक्ष संघटना तसेच स्वयंसेवी संस्थांनी व्यासपीठ उभारून विविध कार्यक्रम सादर केले.
जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे या वर्षी क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्यातील 52 शिव पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येत असल्याची माहिती आयोजक विनोद पाटील यांनी दिली. दुपारी संस्थान गणपती येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर संध्याकाळी शिवचरित्र गाथा या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे महोत्सव समितीने स्पष्ट केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker