मित्राला भेटून घरी निघालेल्या दोन मावस भावाच्या दुचाकीला अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री देवळाई ते झाल्टा फाटा रस्त्यावरील गांधेली फाट्यावर घडली. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अभिषेक बाबासाहेब बोर्डे वय-21 (रा.ह.मु.पुणे, मूळ,मालेवाडी, बदनापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सिद्धार्थ संदिपान गाडेकर वय-17 (रा.चिकलठाणा) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अभिषेक आणि सिद्धार्थ हे दोघेही मावस भाऊ आहेत. दोघेही रविवारी संध्याकाळी मित्राला भेटण्यासाठी दुचाकी वरून बीडबायपास येथे गेले होते.मित्राच्या घरून ते रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घराकडे निघाले होते. दरम्यान देवळाई कडून झाल्टा फाट्याकडे जाणार्या रस्त्यावरील गांधेली फाट्यावर अज्ञात वाहनांच्या सोबत दुचाकीचा अपघात झाला. दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.ही बाब समजताच ओळखीच्या काही मित्रांनी दोघांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले .मात्र त्यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून अभिषेकला मृत घोषित केले.तर सिद्धार्थ गंभीरपणे जखमी झाला आहे. त्यावर उपचार सुरू आहे. घटना घडली तेंव्हा तेथे कोणीही उपस्थित नसल्याने व सिद्धार्थवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने नेमका अपघात कसा झाला हे दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अभिषेक एकुलता एक;
तीन दिवसांपूर्वी आला पुण्याहून
आई-वडिलांना अभिषेक हा एकुलता एक होता.तो घरच्यांचा लाडका होता. त्याला महाविधालयीन शिक्षण पुण्यात करायचे असल्याने पाच वर्षा पूर्वी बदनापूर हुन आई वडील अभिषेकला घेऊन पुण्यात स्थायिक झाले होते.तीन दिवसांपूर्वीच तो औरंगाबादेत आला होता.अपघातात अशा दुर्दैवी पद्धतीने अभिषेकचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
















