औरंगाबाद : जगाला हादरवून टाकणार्या कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरात शिरकाव केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या महिलेमध्ये कोरोनाची लागन झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. ही महिला नुकतीच रशिया व कझाकिस्तानच्या दौर्यावरून शहरात परतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी सांजवार्ता प्रतिनिधीने संपर्क साधला असता डॉ. प्रसाद कुंडे यांनी आपण विषयावर काहीही बोलू शकत नसल्याचे सांगितले. या संदर्भात हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी हेमांशू गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याच सल्ला त्यांनी दिला. गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल उचलण्याचे साफ नाकारले त्यामुळे या संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान राज्यात शनिवारी कोरोना आजाराच्या चौदा नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 32 झाली आहे. यातील चार जण हे पुणे येथील पहिल्या दोन बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. यापैकी एक रुग्ण औरंगाबाद, एक रुग्ण अहमदनगरला, दोन यवतमाळला, तर एक जण मुंबईत भरती आहे. या पाच जणांबरोबरच मुंबईत आणखी चार जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदुजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णांची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.