औरंगाबाद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येते. राज्य शासनाने जिल्हाधिकार्यांकडून अहवाल मागवल्याने आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम वेगात सुरू आहे. सदर अहवाल उद्याच राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली.
विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. याच अधिवेशनात संभाजीनगरचा प्रस्ताव मांडण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू आहेत. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतराला हिरवा कंदील दिल्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ‘सांजवार्ता’शी बोलताना सांगितले. राज्य शासनाने याबाबत जिल्हाधिकार्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. सदरचे पत्र दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार आता संभाजीनगरबाबत सर्व माहिती संकलित करण्यात येत आहे. शहराचे नामकरण करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव त्याचबरोबर न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांची काय स्थिती आहे, याचीही माहिती या अहवालात दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळपासूनच महसूल विभाग कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होता. प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी अधिकार्यांची तातडीची बैठक घेत अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज आणि उद्या सविस्तर अहवाल करून तातडीने तो राज्य शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे पालवे यांनी सांगितले.
संभाजीनगर होणारच : खैरे यांचा दावा
दरम्यान संभाजीनगर नामकरणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेने संभाजीनगर नामांतरासाठी पाठपुरावा केल्याचे ते म्हणाले. आता शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याने नामांतराला कोणतीही अडचण येणार नाही, असाही दावा खैरे यांनी केला. गेल्या महिनाभरापासून मी स्वतः तसेच आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना भेटून तातडीने नामांतर करण्याची मागणी केली होती. आता विधिमंडळ अधिवेशनातच याचा निर्णय होऊ शकतो अशी अपेक्षा खैरे यांनी व्यक्त केली आहे.