भाजपचाही विरोधही मावळला
जि. प. बांधकाम सभापतींच्या भावाला 19 कोटींचे टेंडर
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मर्जीतल्या दोन ठेकेदारांना तब्बल 32 कोटींची कामे मिळणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सर्वपक्षीय एकमत झाल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे विरोधी पक्षात असलेल्या भाजपने ही मूकसंमती दर्शवल्याने कंत्राटदारांचा मार्ग मोकळा झाला आहे. बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या भावाला 19 कोटींचे कंत्राट मिळणार आहे.
सिल्लोड -सोयगाव तालुक्यातील 200 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 28 कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विकास कामे तसेच पन्नास लाखांच्या औषध खरेदीचा प्रस्तावही उद्याच्या सभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. कोरोना संकटाच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे एकदाच मंजूर करण्याची जिल्हा परिषदेला घाई काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेवर सध्या महा विकास आघाडीची सत्ता आहे. मात्र उपाध्यक्षपद भाजपने पटकावले आहे. इतर मुद्द्यावर कायम आमने-सामने येणारे हे पक्ष कंत्राटदाराच्या भल्यासाठी मात्र एकत्र आले आहेत. दोन दिवसांपूर्वी विरोधाचा सूर आळवणार्या भाजप सदस्यांनी आता काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला.
राज्यमंत्र्यांच्या मर्जीतले ठेकेदार !
दरम्यान ऐन वेळेचे विषय म्हणून दोन ठेकेदारांच्या निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या आहे. त्यात सिल्लोडच्या माणिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि एस. आर. एल. कन्स्ट्रक्शन या दोन ठेकेदारांचा समावेश आहे. राज्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या या दोन ठेकेदारांना तब्बल 32 कोटींची कामे देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने करावयाच्या 25/15 च्या कामांचा यात अंतर्भाव आहे. माणिक इन्फ्रास्ट्रक्चर ला तब्बल 19 कोटींची कामे देण्याचा घाट सभेत घालण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यातील 15 कोटींची तर सिल्लोड सोयगाव तालुक्यातील 5 कोटींची कामे मिळणार आहेत. तर एस.आर.एल कन्स्ट्रक्शनला सिल्लोड तालुक्यातील 13 कोटी 29 लाख रुपयांची रस्त्यांची कामे मंजूर करण्यात येणार आहेत.
बांधकाम सभापतींचे भाऊच कंत्राटदार !
दरम्यान 19 कोटींची कामे मिळणारी माणिक इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या बंधूची आहे. निविदा प्रक्रियेत या कंपनीला सिल्लोड भाग 1 मधील 8 कोटी 47 लाख 10 हजार 496 रुपयांचा विविध विकास कामांचा ठेका मिळणार आहे तर सिल्लोड भाग 2 मधील 6 कोटी 77 लाख 76 हजार 516 रुपयांचा एक ठेका मंजूर करण्यात येणार आहे. सोयगाव तालुक्यातील ही 5 कोटी 89 लाख 81 हजार 749 रुपयांचा ठेकाही याच बांधकाम कंपनीला मिळणार आहे. म्हणजेच जवळपास 19 कोटीचे कंत्राट बांधकाम सभापतींच्या घरातच मिळणार आहे.














