औरंगाबादकरांचा निर्धार आता कोरोना हरणार!

Foto
 पोलिस आयुक्‍तांसह जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्‍त तसेच मनपा प्रशासकांची शहरावर करडी नजर
8 चौका चौकात आणि गल्‍ली-बोळाच्या तोंडावर पोलिस तैनात 
8 शहराचे सीमा सील ः कसून केली जातेय आरोग्य तपासणी
8 प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेने फुंकले कोरानाविरुद्ध रणशिंग
 औरंगाबादकरांचा निर्धार आणि प्रशासकीय यंत्रणेमधील समन्वयामुळे आजपासून सुरू झालेल्या 9 दिवसांच्या संचारबंदीला खर्‍या अर्थाने कोरोनाविरुद्धच्या जनआंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्त्यावर उतरण्याचा, दुचाकी फिरवण्याचा मोह नागरिकांनी पूर्णपणे टाळल्याचे चित्र दिसत होते. चौका-चौकात आणि गल्‍ली-बोळाच्या तोंडावर पोलिस तैनात आहेत, शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर येणार्‍या वाहनाची कसून तपासणी तर होत आहेच शिवाय प्रत्येक व्यक्‍तीची आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे. पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद तसेच मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी रस्त्यावर उतरून सकाळी परिस्थितीचा आढावा घेतला. शिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बरोबरच विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकरही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्यामुळे कोरोनाविरुद्ध खर्‍या अर्थाने आता रणशिंग फुंकले गेले असल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीच्या लॉकडाऊन दरम्यान मुख्य रस्ते ओस आणि गल्लीबोळात सर्वकाही सुरळीत असे चित्र होते.मात्र आज शहराचा आढावा घेतला असता रस्त्यावर ठिकठिकाणी  पोलीस बॅरिकेटस् लावून पोलीसांचा फौजफाटा तैनात होता. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलोस निरीक्षक  हद्दी मध्ये कोणीही नागरिक विनाकारण बाहेर फिरणार नाही याची खबरदारी घेत होते. तर  गल्ली बोळात देखील पोलीसांची उपस्थिती होती.
मागील तीन महिन्यात नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला पूर्णपणे स्वीकारले नसल्याचे दिसत होते.त्यामुळे काही भागात  विनाकारण फिरणार्‍या वर पोलिसांना लाठीचा  वापर करावा लागला होता.मात्र आजचे चित्र काही औरच होते,नागरिकांनी स्वतःहून घराबाहेर येणे टाळले त्यामुळे हा खर्‍या अर्थाने जनता कर्फ्यु असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद तसेच गुन्हे शाखेचे एसीपी डॉ. नागनाथ कोडे हे स्वतः संपूर्ण शहरभर फिरून या संचारबंदीवर लक्ष ठेऊन आहेत तर उपायुक्‍त निकेश खटमोडे  यांनी सकाळीच 8 वाजता महावीर चौकाचा ताबा घेत ये-जा करणार्‍या वाहनांची तपासणी सुरू केली होती.  वरिष्ठ अधिकारी देखील आता रस्त्यावर उतरल्याने विनाकारण फिरणार्‍याची आता बिलकुल गय केली जाणार नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे.
प्रशासकीय यंत्रणा रस्त्यावर 
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 10 ते 18 जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलिस, महसुल प्रशासनाने ‘मास्टर प्लॅनिंग’ केली आहे. या काळात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह अधिकार्‍यांची टिम रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेणार आहे़ दिवस-रात्र हे अधिकारी अचानक भेट देऊन गस्त घालणार आहेत. 18 जुलैपर्यंत असणार्‍या संचारबंदीला सुरूवात झाली आहे. संचारबंदी काळात कोणीही बाहेर पडू नये. पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच प्रशासनाने दिलेला आहे.संचारबंदीच्या नियमांचे नागरीकांद्वारे पालन होत आहे कि नाही, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाली आहे. शुक्रवारी (दि.10) संचारबंदिच्या पहिल्याच दिवशी अधिकार्‍यांचा फौजफाटा रस्त्यांवर तैनात करण्यात आला आहे. यात महानगरपालिकेचे 440 कर्मचारी, 10 प्रभाग अधिकारी तसेच विभागप्रमुख, 20 सुपरवायझर यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांचा समावेश आहे. 200 टिम यासाठी सज्ज करण्यात आली आहे. परिस्थितीबद्दल वेळोवेळी माहिती देण्याचे या टिमच्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दिवस-रात्र राहणार अधिकार्‍यांची नजर
संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचार्‍यांबरोबरच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय हे मैदानात उतरणार आहेत. मनपा आयुक्त पाण्डेय हे सायंकाळी तसेच रात्री, तर विभागीय आयुक्त केंद्रेकर हे रात्रीच्या वेळी परिस्थितीवर नजर ठेवणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरीही अचानक अनेक भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आज सकाळपासून हे वृत्तदेईपर्यंत शहरवासीयांनी दिलेला प्रतिसाद पाहून प्रशासकीय यंत्रणा सुखावली असल्याचे दिसून आले.