भाजपने जाळला चीनचा झेंडा
चीन सैन्याविरुद्ध देशभर आक्रोश व्यक्त होत असताना भाजपने आज क्रांती चौकात शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहत चीन सरकारचा निषेध केला. यावेळी चीन सैनिक हाय हाय च्या घोषणा देत चीनचा झेंडा जाळण्यात आला. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. या घटनेने देशभर संताप व्यक्त होत आहे. भारतीय जनता पार्टीने क्रांती चौकात आज दुपारी बाराच्या सुमारास शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी चिनी सैनिकांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी चीन सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी चीनचा झेंडा जाळला. चिनी मालाच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. भारतीयांनी चिनी वस्तू खरेदी करू नये असे आवाहन शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी खासदार डॉक्टर भागवत कराड, शहराध्यक्ष संजय केणेकर, आमदार अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर, दयाराम बसैये, कचरू घोडके, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती.