औरंगाबाद : महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या दौर्यानंतर शिवसेनेला शह देण्याची रणनीती भाजपने असल्याचे समजते. शिवसेना नगरसेवकांच्या वार्डातील इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश प्रदेश स्तरावरून देण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून भाजप कार्यकर्ते घराबाहेर पडले असून इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
मित्रपक्ष भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आता औरंगाबाद महानगरपालिकेत दोन्ही पक्षांचा कस लागणार आहे. गेली पाच वर्ष युतीची सत्ता महानगरपालिकेत होती. आता पहिल्यांदाच या दोन्ही प्रमुख पक्षात थेट मुकाबला पाहायला मिळेल. या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेची घेराबंदी करण्याची रणनीती आखली आहे. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना नगरसेवकांच्या वार्डात भाजप इच्छुकांना काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेनेचे वॉर्ड निशाण्यावर !
भाजपने शिवसेना नगरसेवकांचे वार्ड अजेंड्यावर घेतले आहेत. या वार्डातील भाजप इच्छुकांना बळ देण्यात येत आहे. जवळपास 35 ते 40 वार्ड भाजप कडून निवडण्यात आले आहेत. या वार्डातील भाजप इच्छुकांना घरोघरी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र सुरू केले. काही इच्छुकांनी तर पत्रके छापून जबरदस्त तयारी सुरू केल्याचे दिसते.
मिळाला खास निरोप !
भाजपकडे सध्या तरी जवळपास 80 वॉर्डातील इच्छुकांची यादी तयार आहे. उर्वरित 30 ते 35 वार्डात भाजपला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. यापैकी जवळपास निम्म्या वॉर्डात भाजपने उमेदवारांची निवड जवळपास नक्की केल्याचे समजते. या उमेदवारांना कामाला लागण्याचे खास आदेश मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.