बहुचर्चित कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना लक्ष्य करून राष्ट्रवादी काँग्रेस वारकरी संप्रदाय संपविण्याचे कारस्थान करीत आहे. असा हल्ला भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सोमवारी केला. या सर्व प्रकरणात भाजप इंदोरीकर महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या मागे भक्कमपणे उभा असे असेही भाजप प्रक्त्याने स्पष्ट केले.
इंदोरीकर महाराज यांनी स्त्री-पुरुष संतती संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून ते सध्या वादग्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचीही मागणी केली जात असून यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. या संदर्भात भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. इंदोरीकर महाराजांनी धर्मग्रंथात सांगितलेल्या गोष्टी कीर्तनात रंगवून सांगितल्या. धार्मिक ग्रंथाचा त्यांच्या वक्तव्याला आधार आहे. परंतु या वक्तव्याचा बागुलबा करून महाराजांनी फार मोठा गुन्हा केला अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. या सगळ्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा वारकरी संप्रदायाविषयी असलेला राग कारणीभूत असला पाहिजे असे त्यांनी म्हटले असून भारतीय जनता पक्ष इंदोरीकर महाराजांच्या मागे उभा असल्याचे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याला फुले, शाही, आंबेडकराच्या महाराष्ट्रात स्थान नसल्याचे म्हटले आहे. मनुवादी विचाराच्या धर्म ग्रंथातून इंदोरीकर महाराजांनी आधार घेणे कितपत समर्थनीय आहे, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांनी रॅली, मोर्चे वगैरे कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये, आपण कायदेशीररित्या आपली बाजू मांडणार आहोत, सर्व समर्थकांनी शांतता राखावी, असे आवाहन निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले आहे. मध्यंतरी वारकरी संप्रदायाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे हिंदू विरोधी असून त्यांना संप्रदायाच्या कार्यक्रमाला बोलावू नये, असे आवाहन केले होते. या सर्व प्रकरणाच्या मागे शरद पवारांचे दुखावले जाणे असू शकते, असा कयास केला जात आहे.