सावध पावलांनी... थाटामाटात, आनंदाचा वर्षाव करीत घरोघरी बाप्पा विराजमान
ढोल-ताशांचा दणदणाट... गुलालाची उधळण... डोक्याला बाप्पा मोरयाची भगवी पट्टी बांधलेले गणेशभक्तांचे जत्थे अन मोठ मोठ्या वाहनातून गणेश मूर्ती घेऊन जाणारे मंडळांचे कार्यकर्ते...दरवर्षी आजच्या दिवशी दिसणारे हे चित्र यावर्षी नजरेआड झाले. कोरोनामुळे काहीसा शांत झालेला बाजार, तोंडाला मास्क लावलेले गणेशभक्त, सावधपणे बाप्पाला हाताळताना दिसून आले. संसर्गाने आनंदाला मास्करुपी बंधन घातले असले तरी सावध पावलांनी... थाटामाटात अन् आनंदाचा वर्षाव करीत घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. संस्थान गणपती येथे आज गणेश महासंघाच्या वतीने पदाधिकार्यांच्या उपस्थितीत श्री ची स्थापना करण्यात आली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निर्बंधांचे चोख पालन करीत शहरवासीयांनी गणरायाचे उत्साहात स्वागत केले. काही दिवसांपासून बरसणार्या वरुणराजाने आजही उत्साहाने भरून वाहणार्या शहरावर वर्षाव केला. सकाळपासूनच औरंगपुरा, गुलमंडी, शहागंज, टीव्ही सेंटर, गारखेडा परिसरात गणेश मूर्ती घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. सर्वच बाजार भरभरून वाहत होते. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मूर्तीच्या आकारावर मर्यादा आल्या आहेत त्यामुळे भाविकांनी छोट्या मूर्तीला प्राधान्य दिल्याचे व्यापार्यांनी सांगितले. सजावटीच्या सामानाचीही बाजारात रेलचेल दिसून आली. यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाला परवानगी नसल्याने घरोघरी लागणारे कृत्रिम हार, फुले, फळे यासह मखराचे असंख्य प्रकारही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सामानाला ही ग्राहकांचा चांगला मिळत आहे.
घराघरात सजले बाप्पा !
दरम्यान आज सकाळपासूनच गणेशाच्या आगमनाची घरोघरी लगबग सुरू होती. विविध रंगी फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी घर अंगण सजले होते. शाळांना सुट्ट्या असल्याने बच्चेकंपनीने बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली. धार्मिक तसेच सांस्कृतिक सण उत्सवांची रेलचेल असलेला हा महिना मोठ्या आर्थिक उलाढालीचा असतो.