शेंदुरवादा शिवारात धाडसी दरोडा

Foto
चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून महिलांचे दागिने ओरबाडले स मारहाणीत पिता-पुत्र जखमी
लघु शंकेसाठी घराचा दरवाजा उघडताच घराबाहेर पाळत ठेऊन बसलेल्या सात-आठ दरोडेखोरांनी घराचा ताबा मिळवत पिता-पुत्राला बेदम मारहाण केली व तीन वर्षीय चिमुकल्याला चाकू लावत घरातील महिलेच्या अंगावरील दाग-दागिने ओरबाडले. 20 हजार रुपये रोख व सोने असा सुमारे 50 हजाराचा ऐवज लुटण्याचा आला. दरोडेखोरांच्या  मारहाणीत पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. ही घटना आज पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास वाळूज जवळील शेंदूरवादा शेतवस्तीवर घडली.
गुलाब बनेखा सय्यद वय-51, रियाज गुलाब सय्यद वय-28 (दोन्ही रा.शेंदूरवादा वस्ती) अशी जखमी पिता-पुत्राची नावे आहेत. या घटने प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, सय्यद परिवार हे शेतकरी परिवार असून दिवसभराचे काम आटोपून रात्री 10 च्या सूमरास घरातील सर्व सदस्य दार बंद करून झोपले होते.
मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गुलाब सय्यद हे लघुशंके साठी झोपेतून उठले व घराचा दरवाजा उघडताच आधी पासून दबा धरून बसलेल्या सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने लाठ्या-काठ्या चाकू घेत घरात प्रवेश करून घराचा दरवाजा बंद केला. दोन ते तीन दरोडेखोरांनी गुलाब सय्यद आणि त्यांचा मुलगा रियाज ला मारहाण करण्यास सुरुवात केली तर इतर दोघे आतील खोलीत गेले व  त्यांनी  प्रसूतीसाठी वडिलांच्या घरी आलेल्या मुलीच्या तीन वर्षीय चिमुकल्याला उचलले व  त्यास चाकू लावून आतील खोलीत झोपलेल्या सय्यद यांच्या पत्नी शकीलाबाई, सून यासिन व मुलगी हिना यांना आरडाओरड केल्यास मुलाला जीवे ठार मारू असे धमकावले.व त्यांच्या अंगावर असलेले सोने ओरबाडले. मुलगा दरोडेखोरांच्या तावडीत असल्याने तिन्ही महिलांनी कोणताही विरोध केला नाही. दरोडेखोरांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले. त्यांना रोख 20 हजार रुपये मिळाले तो ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले.
काही वेळा नंतर भेदरलेल्या महिला समोरील घरात आल्या नंतर पिता-पुत्र दोघेही जखमी अवस्थेत दिसताच महिलांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील शेतकरी तेथे आले.या बाबत पोलिसांना माहिती देताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.या प्रकरणी दुपारपर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.