...जिल्हाधिकारी हर्सुल तलावावर !

Foto
पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय दौऱ्यावर निघालेले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण थेट हर्सूल तलावावर पोहोचले. तब्बल १४ वर्षानंतर भरलेल्या तलावाची पाहणी करीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
शहरातील निझामकालीन हर्सुल तलाव, या तलावांवरील १९ पाझर तलावांचे महानगरपालिका, जिल्हा परिषद, जलसंधारण आणि जलसंपदा विभागाने संयुक्तपणे तपासणी करून तत्काळ सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  चव्हाण यांनी दिले. 
हर्सुल तलावातील पाण्याची पातळी, साठा, वितरण, तलावाकाठची गावे, नागरिकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजना, करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर आढावा श्री. चव्हाण यांनी घेतला. हर्सुल तलावात येणाऱ्या पाण्याच्या १९ पाझर तलावांसह, खाम नदी काठच्या नागरिकांना आवश्यक त्यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. यासाठी दवंडी, एसएमएस आदीमाध्यमातून तत्काळ सूचना प्राप्त होतील, यादृष्टीनेही उपाययोजना करण्याच्या सूचना महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांनी दिल्या. 
पावसाळ्यामध्ये हर्सुल तलावावर नागरिकांना प्रवेशबंदी करावी. या ठिकाणच्या सर्व फलकांवर सुस्पष्ट संदेश असावेत. चोविस तास कर्मचारी तैनात करावेत, विजेचे खांब लावण्यात यावेत. तलावांसह खामनदीतील पाण्याची पातळी समजण्यासाठी मैलांच्या दगडांचा वापर करून पाण्याच्या पातळीची मार्किंग करावी, अशा सूचनाही चव्हाण यांनी संबंधितांना केल्या. त्याचबरोबर तलावावरील उपस्थित नागरिकांशी चव्हाण यांनी संवाद साधत तलावाची काळजी घेण्याचे आवाहन केले.