गलवाण खोर्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. चिनी सैन्याच्या युनिटचा कमांडिंग ऑफिसर ठार झाला आहे. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या संघर्षात भारतीय कमांडिग ऑफिसर संतोष बाबू यांच्यासह 20 जवान शहीद झाले आहेत.
घटनास्थळावर स्ट्रेचरवरुन चिनी सैनिकांना नेण्यात येत होते तसेच रुग्णवाहिकेच्या फेर्या सुद्धा सुरु होत्या असे सूत्रांनी सांगितले. या संघर्षामध्ये सहभागी असलेल्या सैनिकांनी चीनच्या बाजूलाही नुकसान झाल्याचे सांगितले. त्यांचे नेमके किती नुकसान झाले ते लगेच स्पष्ट करता येणार नाही. पण 40 पेक्षा जास्त चिनी सैनिक मारेल गेले आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नियंत्रण रेषा तसेच गलवाण आणि श्योक नदीच्या जंक्शनच्या भागात हा संघर्ष झाला. गलवान खोर्यातून चिनी सैन्याने माघार घ्यावी, यासाठी पेट्रोलिंग पॉईँट 14 वर दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकार्यांमध्ये चर्चा सुरु होती. हा भाग नियंत्रण रेषेजवळ आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूच्या सैन्य अधिकार्यांमध्ये झालेल्या चर्चेत बफर झोन निर्माण करण्याचं ठरलं होतं. म्हणजे नियंत्रण रेषा तसेच गलवाण आणि श्योक नदीच्या जंक्शनचा भाग पूर्णपणे निर्मनुष्य करण्याचा निर्णय झाला होता. समोरासमोरचा संघर्ष टाळण्यासाठी भारतीय सैनिक नदीच्या पश्चिमेला तर चिनी सैनिक पूर्वेला नियंत्रण रेषेजवळ जाणार होते. बफर झोनमध्येच गलवाण नदीच्या दक्षिण किनार्यावर चिनी सैनिकांनी जेव्हा, नवीन चौकी उभारण्याचं काम सुरु केलं. त्यावरुन नव्या वादाला सुरुवात झाली असे अधिकार्याने सांगितले. 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी आणि त्यांच्या तुकडीने ही चौकी हटवण्यासाठी चीनच्या सैन्य अधिकार्यांकडे आग्रह धरताच लगेच तणाव वाढला आणि संघर्षाची स्थिती उदभवली.