एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे चिंता वाढत चालली आहे. त्यातच दुसरीकडे आता व्यापारीवर्ग देखील आर्थिक संकटात सापडले आहेत. शहरातील सर्वच दुकाने जवळपास उघडण्यात आले आहेत. त्यात दुकाने उघडूनही ग्राहक बाजारातून गायब आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाला ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले असल्याने सर्व दुकाने बंद करण्यात आल्याने आधीच आर्थिक फटका बसला होता. त्यात जूनमहिन्यात 6 तारखेपासून सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात आले. त्यातही फारशे ग्राहक बाजारात आले नाहीत. इतकेच नव्हे तर जुलै महिन्यात 10 दिवसांचा पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजार पुन्हा बंद करण्याची वेळ व्यापार्यांवर आली. यातही बरेच नुकसान झाले. त्यानंतर मार्केट हळूहळू सर्व उघडण्यात आले. मात्र तोपर्यंत खरेदीचा काळ संपून गेला होता. एप्रिल ते जून दरम्यान सर्वाधिक खरेदी करण्याचा काळ असतो. परंतु या काळात कोरोनाचा परिणाम झाला. त्यानंतर आता मार्केट उघडण्यात आले असले तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पहाता ग्रामीण भागातील ग्राहक बाजारात खरेदीसाठी फिरकत नाही. शहरातील नागरिक ऑनलाईन खरेदीवर भर देत आहेत. त्याचा परिणाम बाजारात ग्राहक गायब आहे. याचा सर्वाधिक आर्थिक फटका व्यापार्यांना बसत आहे. कॅनॉट परिसर, पैठण गेट, गुलमंडी, टीव्ही सेंटर सह आदी भागांतील मोबाईल शॉपी, कपडा, स्टेशनरीसह आदी दुकानातून ग्राहक बाजारातून गायब आहेत.
दिवाळी, दसर्याला व्यवसाय होण्याची शक्यता
आता सर्व खरेदी, विक्रीचा कालावधी तर गेला त्यामुळे आर्थिक नुकसान झाले. प्रतिदिन ग्राहकांची वाट पाहिली जात आहे. ग्रामीण भागातून सर्वाधिक ग्राहक शहरात खरेदी साठी येतात. परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागातून देखील ग्राहक शहरात येत नाहीत. शहरातील नागरिक देखिल खरेदीसाठी येईना. त्यामुळे ग्राहकांची प्रतीक्षा आम्हाला करण्याची वेळ आली असल्याचे व्यापारी किशोर काल्डा यांनी सांगितले. आता दिवाळी, दसरा सणाला तरी व्यवसाय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.