हवाई वाहतुकीची लक्तरे वेशीवर
रात्रीच्या अंधारात शेकडो वाहनांद्वारे शहरात घुसखोरी होत असताना विमान वाहतुकीने बेजबाबदार पणाचा कळस गाठला होता. पंतप्रधान मोदींनी लॉक डाऊन जाहीर करण्यापूर्वी जवळपास तीन आठवडे शहरात शेकडोंच्या संख्येने प्रवासी दाखल होत होते. विमान प्रवास करून आलेल्यांची विमानतळावर साधी तपासणीचीही सोय नव्हती. देशात कोरोनाने हाहाकार उडवला असताना अन पुण्या-मुंबईसारख्या शहरात प्रचंड काटेकोर काळजी घेतली जात असताना चिकलठाणा विमानतळावर कर्मचारीच विना मास्क फिरत असल्याचे ओंगळवाणे चित्र होते. एका सजग प्रवाशाने ही सुरस कथा सोशल मीडियावर कथन केली आणि औरंगाबादच्या हवाई यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली.
शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याला आरोग्य यंत्रणेचा गाफीलपणा जितका कारणीभूत आहे. तितकाच वाहतूक, पोलीस आणि जबाबदार अधिकाऱ्यांचीही बेफिकिरी कारणीभूत आहे. शहरातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण हवाई प्रवास करूनच दाखल झाला होता. म्हणजेच सर्वात मोठा धोका हवाईमार्गेच होता. प्रारंभीच्या काळात सर्वात कडेकोट व्यवस्था विमानतळावरच असायला हवी होती. मात्र तेथेच मोठी चूक झाली. विमानतळावरून दिवसाकाठी शेकडोंच्या संख्येने प्रवासी शहरात दाखल होत होते. संसर्गाच्या काळातच तब्बल तीन आठवडे विमानसेवा सुरू होती. या काळात झालेला हलगर्जीपणा संसर्ग वाढण्याला कारणीभूत ठरला. विमानतळावर उतरणार्या प्रत्येक प्रवासाची थर्मल गनद्वारे तपासणी आवश्यक होती. अलगीकरण, मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग या नियमांचे पालन व्हायला हवे होते. मात्र प्रशासन गाफील राहिले. विमानतळ कर्मचारीही असुरक्षित होते. एका सजग प्रवाशाने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करीत विमानतळ प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड केला. सदर प्रवासी दिल्लीहून मुंबईला आणि मुंबईहून औरंगाबादेत दाखल झाला होता. देशभरातील विमानतळावर घेण्यात येत असलेली काळजी आणि उपाय योजना याची तुलना करीत चिकलठाणा विमानतळावर असलेली अनागोंदी त्याने जगजाहीर केली. विमानातून उतरल्यानंतर आपण वेगळ्या स्वतंत्र दुनियेत आल्याची जाणीव झाल्याचे तो लिहितो. दिल्ली-मुंबईत काटेकोर नियमांचे पालन केल्या जात होते. चिकलठाणा विमानतळावर मात्र सारे आलबेल होते. प्रवासी गटागटाने बाहेर पडत होते. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनीच मास्क घातलेले नव्हते. हॅन्ड ग्लोजचाही पत्ता नव्हता. सर्व कर्मचारी- अधिकारी बिनदिक्कत फिरत असल्याचे चित्र धडकी भरवणारेच होते असे तो लिहितो. प्रवाशांची थर्मल गन द्वारे तपासणी करावी असे आदेश असताना जवळपास दोन आठवडे विमानतळ प्रशासन गाढ झोपेत राहिले. अखेर काही पत्रकारांनी ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर तातडीने हालचाली झाल्या. आरोग्य, महसूल यासह इतर पथके विमानतळावर दाखल झाली. मात्र तोपर्यंत व्हायचे तेच झाले. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळूहळू संसर्ग वाढत गेला.
पुण्याचा पाहुणा आणि लाडका मेव्हणा !
शहराच्या नाकेबंदीत किती मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा झाला. याबाबत असंख्य उदाहरणे उघडकीस आली आहेत. दीड महिन्यांपूर्वी मुकुंदवाडी परिसरात पुण्याहून अनाहूत पाहुणा दाखल झाला. सख्खा मेहुणा असल्याने कुटुंबाने आदरातिथ्य करीत त्याचे स्वागत केले. ख्याली खुशाली झाली गप्पागोष्टी झाल्या पाहुण्याने बाजीवर काहीशी विश्रांती घेतली. ओळखीच्या चार दोन जणांच्या गाठीभेटी घेऊन पाहुणा जेवणासाठी पुन्हा घरात आला. जेवण वाढताना महिलेला पाहुण्याच्या हातावर शिक्का दिसला अन एकच गोंधळ उडाला. महिलेने आरडाओरड करून पाहुणा कोरोनाग्रस्त असल्याची बोंब ठोकली. या गोंधळाने बेसावध असलेली गल्ली गोळा झाली. आता आपली खैर नाही असे लक्षात येताच पाहुण्याने चक्क धूम ठोकली आणि पसार झाला. लाडक्या मेहुण्याच्या संपर्कात आलेल्यांनी घाटीत धाव घेतली तर पसार झालेला मेहुणा शोधण्याचे कष्ट कोणीही घेतले नाही. पुण्या-मुंबईत क्वारन्टीन केलेले नागरिकच अशा प्रकारे शहरात दाखल झाले असतील तर संसर्गाची स्थिती यापेक्षा वेगळी काय असणार ?