शहरातील पहिल्या कोरोनाग्रस्त प्राध्यापक महिलेवर यशस्वी उपचार करणारे आणि गेल्या तीन महिन्यात तब्बल ३०० च्या वर रुग्णांना कोरोनाच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर काढणाऱ्या देवदूत डॉक्टरांनाच कोरोनाची बाधा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
औरंगाबाद आणि मराठवाड्यात पहिला कोरोनारुग्ण ७ मार्च रोजी आढळून आला. कझाकिस्तान येथून आलेल्या प्राध्यापिकेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी संकलित प्राध्यापिकेवर यशस्वी उपचार केले होते. त्यानंतर अशा प्रकारच्या ३०० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त याच डॉक्टरांनी या महामारीपासून मुक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर सदर डॉक्टरांचे कोरोना रुग्णांशी सततच्या संपर्क येत गेला आणि त्यातून त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले. सांजवार्ताने संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता ही बाब खरी असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्याच खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.
मराठवाड्यातील पहिल्या महिलेवर केला होता उपचार
कोरोनाची सुरवात मार्च महिन्यात शहरात झाली. ७ मार्च नंतर एक महिला कोरोना संशयीत म्हणून म्हणून आढळून आली होती. त्या महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ९ मार्च पासून शहरात एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात झाली. तेव्हा या महिलेवर खासगी रुग्णालयात ज्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तिच्यावर यशस्वी पणे उपचार केले होते. त्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत गेली. त्यानंतर देखील त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तीनशेहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.
आतातरी गांभिर्याने घ्यावे
आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत. नागरिकांनी याचा तरी विचार करावा. आज रुग्णांवर उपचार करता करता मी पॉझिटिव्ह झालो आहे. औरंगाबाद शहरात केवळ एकच रुग्ण पॉझिटिव्ह होता आज ती संख्या सहा हजारवर गेली आहे. त्यामुळे चिंता वाढत चालली आहे. आतातरी याकडे गंभीरपणे बघावे आणि स्वतः ची काळजी घ्यावी. डॉक्टर, पोलीसप्रशासन, आरोग्य विभागाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.












