मराठवाड्यातील धरणे काठोकाठ!

Foto
जालना, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यावर गोदामाईची कृपा!
सलग चार महिने सुरू असलेला जोरदार पाऊस अन धरण क्षेत्रात झालेली अतिवृष्टी यामुळे मराठवाड्यातील मोठी आठ धरणे काठोकाठ भरली आहेत. तर सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून दुथडी भरून गोदामाईचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या दशकाभरापासून पावसासाठी आसुसलेल्या मराठवाड्यावर झालेली वरुण राजाची कृपादृष्टी आबादानी करून गेली.
साधारणत: 2012 नंतर मराठवाड्यात निसर्गाचे दृष्ट दुष्टचक्र सुरू झाले. सततचा अवर्षण आणि दुष्काळ कधी अतिवृष्टी तर दीर्घ खंडाने शेती पिके उध्वस्त झाली होती. 2015 नंतर तर मराठवाडा अक्षरशः टँकर वाडा झाला. तीन वर्षांपूर्वी तर लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले. अशा भयंकर परिस्थितीला तोंड देणार्‍या या विभागावर यंदा वरुणराजाने धोधो बरसात केली. मराठवाड्यात तब्बल आतापर्यंत 116 टक्के पाऊस कोसळला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 159 टक्के तर जालना जिल्ह्यात 150 टक्के पाऊस झाला. बीड 122, हिंगोली 116, लातूर 104, परभणी 100, नांदेड 97 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 96 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 
या पावसाने जिल्ह्यातील मध्यम आणि लघु तलाव तुडुंब भरले आहेत. नदी-नाले खळखळून वाहत आहेत. तब्बल दशकभरानंतर झालेला हा आनंदाचा वर्षाव मराठवाड्याला चिंब करून गेला आहे.विभागातील 11 मोठ्या धरणांपैकी जायकवाडी धरणात सर्वाधिक पाणीसाठा झाला असून धरणाचे सत्तावीस दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रात तब्बल एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यापाठोपाठ येलदरी आणि सिद्धेश्वर ही दोन्ही धरणे ओसंडून वाहत असून अजूनही या धरणात अनुक्रमे 27 आणि 31 टीएमसी पाण्याची आवक होत आहे. लोअर तेरणा, सिना कोळेगाव, विष्णूपुरी आदी धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. माजलगाव आणि मनार ही धरणेही काठोकाठ भरली असून धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. सिना कोळेगाव धरणही तुडुंब भरण्याच्या बेतात आहे. निम्न दुधना धरणात नऊ टीएमसी पाण्याची आवक सुरू असून धरण साठा 85 टक्क्यावर पोहोचला आहे. एकंदरीत मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये तब्बल 99 टक्के पाणीसाठा झाला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker