रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे येस बँकेचे खातेदार हवालदिल

Foto
औरंगाबाद : भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे येस बँकेचे औरंगाबाद शहरासह इतर ठिकाणचे खातेदार हवालदिल झाले आहेत. चेक क्लिअरिंग करणार्‍या बँकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. येस बँकेचे एटीएम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे.
आर्थिक अनियमितता आणि अवाजवी कर्जवाटपामुळे अडचणीत आलेल्या येस बँकेचे संचालक मंडळ भारतीय रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे. बँकेवर प्रशासक नियुक्‍त करण्यात आला आहे. खात्यातून केवळ 50 हजारांपर्यंत रक्‍कम काढण्याची मर्यादा घातल्याने येस बँकेचे खातेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. औरंगाबाद शहरात जिल्हा न्यायालयासमोर येस बँकेची शाखा असून, येथे जवळपास सहा हजार खातेदार आहेत. या शाखेत अंदाजे 60 कोटी रुपये डिपॉझिट आहेत. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे औरंगाबादेतील या बँकेचे खातेदार हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत 300 जणांनी शहरातील येस बँकेच्या शाखेतून टोकन घेतले. सध्या बँकेकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे येणार्‍या ग्राहकांना आम्ही केवळ टोकन देत आहोत. खातेदारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बँकेचे व्यवस्थापक सय्यद सरताज यांनी केले आहे.
औरंगाबादच्या जिल्ह्यातील येस बँकेच्या तीन शाखा असून, येस बँकेचे 13 हजारांपेक्षा अधिक खातेदारक आहेत. येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याचे समजताच खातेदार हवालदिल झाले आहेत. आपले पैसे बुडतील का, अशी भीती खातेदारांच्या मनात आहे. ठेवी बँकेत असूनही काढता येत नसल्याने संतापलेल्या अनेक ग्राहकांनी शाखेत धाव घेतली.  रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका येस बँकेसह या बँकेतून चेक क्लिअरिंगची प्रक्रिया करणार्‍या इतर बँकांना बसला आहे.  
जिल्ह्यातील लीड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेकडे अशा छोट्या-मोठ्या 109 बँकांची यादी आहे. येस बँकेतील चेक क्लिअरिंग प्रक्रिया थांबल्याने या बँकांसह खातेदारही अडचणीत सापडले आहेत. या बँकांमधील चेक क्लिअरिंगचे कामकाज ठप्प आहे. त्याचा फटका त्यांच्या व्यवहारावरही झाला आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्हा सहकारी बँकांसह छोट्या-मोठ्या सहकारी, खासगी बँकांचा समावेश आहे. काही बँकांच्या ठेवी ही त्यात अडकल्याने त्या बँकांच्या कारभारावर ही परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker