सावकाराच्या जाचाला कंटाळून माजी उपसरपंचाची आत्महत्या

Foto
आत्महत्येपूर्वी आखातवाडा येथील बोडखे यांनी केलेल्या व्हिडिओत अनेकांची नावे
10 लाखाचे 50 लाख वसूल केल्यानंतर ही देत होते त्रास...
 खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा येथील माजी उपसरपंच पोपट उर्फ राधाकृष्ण विठ्ठल बोडखे यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. 10 लाख रुपयाचे व्याजासह 50 लाख फेडून देखील सावकाराकडून त्रास देणे सुरूच असल्याने त्यांनी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गळफास घेण्यापूर्वी त्यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये अनेकांची नावे आहेत. ही धक्कादायक घटना आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, सरकारी कंत्राटदार असलेले माजी उपसरपंच पोपट उर्फ राधाकृष्ण विठ्ठल बोडखे वय-47 (रा.आखातवाडा,ता. खुलताबाद) यांनी व्यावसायासाठी कर्ज घेतले होते. परिसरात त्यांनी अनेक कामाचे गुत्ते घेतले होते. घेतलेल्या कंत्राट पूर्ण करण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी ओळखीच्या दोन व्यक्ती कडून  वेळोवेळी अशी 10 लाख रुपयांची रक्कम व्याजाने घेतली होती. त्याचा व्याज वेळेवर देऊ न शकल्याने व्याजाची रक्कम वाढतच चालली होती.त्यांनी या कालावधीत दोन्ही सावकारां घेतलेल्या व्याजाच्या 10 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये फेडले मात्र तरी देखील अजून पैशाची मागणी दोन्ही सावकार करीत होते. या त्रासाला ते कंटाळले होते.  त्यांनी केलेल्या कामाचे बिल देखील लॉकडाऊन मुळे ते  आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते नैराश्याच्या गर्तेत होते. आज पहाटे ते घर नसल्याने मुलगा व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता  बोडखे यांनी स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलयाचे घरच्यांच्या निदर्शनास आले.या प्रकरणी बोडखे यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
व्हिडिओ मध्ये अनेकांची नावे
आत्महत्येपूर्वी बोडखे यांनी मोबाईल मध्ये एक व्हिडिओ बनविला आहे.त्या मध्ये त्यांनी  राजपूत आणि नलावडे अशा दोन सावकार ची नावे घेतली आहे. व त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे.शिवाय एका शाखा अभियंता बिल काढण्यासाठी त्रास देत असल्याचे देखील म्हंटले आहे याचं बरोबर त्यांनी उधार दिलेल्या लोकांची नावे आणि रक्कमचा उल्लेख आहे.