उपोषण ते उपासमार!

Foto
पाऊणशे वयोमान असलेल्या आंदोलकाचा हृदयद्रावक प्रवास!
मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नावर तब्बल चार दशके शंभराहून अधिक आंदोलने उपोषण करणारा लढवय्या रेल्वे सैनिक हतबल झाला आहे. सरकारी यंत्रणेची अनास्था, राजकीय पक्षांचे अक्षम्य दुर्लक्ष अन वयोमानाने खंगलेले शरीर. आयुष्य रेल्वे प्रश्नी उभे आयुष्य वेचलेल्या या सैनिकांवर उपोषण ते उपासमार अशी दुर्दैवी वेळ ओढवली आहे. रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा असे त्यांचे नाव. तरीही मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना विकासाचेच अर्जव घालत या लढवय्या आंदोलकाने अजून हार मानली नसल्याचे सिद्ध केले.
शहागंज गांधी पुतळ्याजवळ 27 जानेवारी 1980 ला पहिल्या आमरण उपोषणासाठी बसलेल्या या या तरूणाला बाळासाहेब पवार यांनी इस्पितळात दाखल केले होते. त्यानंतर अख्खे आयुष्य त्याने रेल्वे प्रश्नी आवाज उठवत खर्च केले. रेल्वे विकास समिती स्थापन करून एक हाती लढा दिला. 100 हून अधिक आंदोलने एक हाती यशस्वी करण्याची किमया या लढवय्या शिलेदाराने करून दाखवली. शहर ते दिल्ली असा आंदोलनाचा प्रवास भल्याभल्यांना थक्क करणारा आहे. तब्बल अकरा रेल्वेगाड्या सुरू करण्याचे श्रेय वर्मांना जाते. कोणत्याही संघटनेशिवाय एकला चलो रे च्या माध्यमातून मिळवलेले हे यश अद्वितीयच म्हणावे लागेल. 2016 साली 7 ते 9 डिसेंबर दरम्यान त्यांनी दिल्ली येथे उपोषण केले. अहमदनगर -बीड -परळी रेल्वे मार्ग हात यांचा ड्रीम प्रोजेक्ट. 272 किलोमीटरचे हे काम त्यांनी मंजूर करून घेतले. साईबाबांचे भक्त असलेल्या वर्मांच्या म्हणतात आयुष्याचा शेवट झाला तरी चालेल मात्र शिर्डीला रेल्वेमार्ग झाला पाहिजे. नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांची भेट घेऊन गोविंदभाई श्रॉफ यांच्यासोबत त्यांनी महत्त्वाचे काम केले. वर्षभरापूर्वी वर्मांनी रोटेगाव -कोपरगाव मार्गासाठी रक्ताने पत्र लिहिले होते.
मुख्यमंत्र्यांची घेणार होतो भेट!
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री शहरात येतील अशी अपेक्षा होती. त्यासाठी रेल्वे तसेच मराठवाडा विकासाबाबत भलेमोठे निवेदनही मी तयार केले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेरही पडणे शक्य नाही आंदोलन करता येत नाही अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडावे अशी तयारी केली होती. मात्र दुर्दैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्याने निराश झालो आहे. 
- ओमप्रकाश वर्मा
अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती