औरंगाबाद : चीनमधून पसरलेल्या कोरोना या आजाराने जगभर थैमान घातले आहे. भारतातील काही भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने लोकं सतर्क झाले आहेत. महाराष्ट्रातही कोरोणाने शिरकाव केला आहे. याच धर्तीवर औरंगाबादमध्ये देखील भितीने लोकांनी सुरक्षितता म्हणून मास्क व सॅनिटाइजरचा वापर सुरू केला आहे. अधिकारी, कर्मचारी देखील मास्क लावून काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी दुकानांमध्ये मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा दराने वाढल्या आहेत.
शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण, कामानिमित्त बाहेर जाणारे सर्वच सामान्य नागरिकही मास्कचा वापर करत आहेत. हाच मास्क कोरोणा दाखल होण्यापूर्वी अगदीच स्वस्त म्हणजे निव्वळ 5 ते 10 रुपयात मिळायचा.
परंतु सध्या याच मास्कची किंमत दहापट वाढली आहे. या परिस्थितीविषयी सांजवार्ताने प्रत्यक्षात वेगवेगळ्या दुकानामध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी सुमनांजली मेडिकलचे अशोक थापा यांनी सांगितले, त्यांच्या दुकानात 20 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंतचे साधारण मास्क व 250 रुपयांपर्यंतचे स्पेशल मास्क उपलब्ध आहेत. शहरातील सर्जिकल एजन्सीजमधून हे मास्क विकत आणले जातात. परंतु सध्या याच्या निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे अनेक दुकानदार परिस्थितीचा फायदा घेतांना दिसत आहेत. विविध दुकानामध्ये सांजवार्ताने पाहणी केली असता दिवसभरात 90 % ग्राहक मास्क व सॅनिटाइजर विकत घेण्यासाठीच येत आहे. मास्कच्या जास्तीच्या वाढलेल्या किंमती तसेच सॅनिटाइजरचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे ग्राहक चिंतेत आहे. मास्क उपलब्ध आहेत मात्र, सॅनिटाइजर खूप कमी प्रमाणात दिसून आले.
मेडिकल दुकानावर
मास्कचा तुटवडा
शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरुनही सॅनिटाइजर मिळत नव्हते व मास्कमध्येही तुटवडा असल्याने नागरिकांनी गुलमंडी, पैठण गेट येथे गर्दी केली होती. परंतु याठिकाणी देखील मास्क खरेदीसाठी लांबच लांब रांगा दिसत होत्या. एक ते दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर नंबर लागल्याचे ग्राहकांनी सांगितले. तसेच या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्याचे देखील आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.