लायक, प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांचे गेले ते दिन गेले! सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हातातून निसटले राजकीय क्षेत्र

Foto
औरंगाबाद :-  साधारणतः नव्वदीच्या दशकात चळवळीतले, निष्ठावान, गुणी आणि समाजसेवेची आवड असणार्‍या कार्यकर्त्यांना राजकीय पक्ष पुढे करत. त्यांना पाठबळ देऊन राजकीय कार्य कारकीर्द घडवली जाई. मात्र आता सारेच बदलले. धनाढ्य, भाईगिरी, टगेगिरी करणार्‍या कार्यकर्त्यांचे चोचले राजकीय पक्ष पुरवीत आहेत. गुंडगिरी, दडपशाहीला अच्छे दिन आले आहेत. राजकीय क्षेत्र आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. प्रामाणिकपणा साधेपणा, स्वच्छ प्रतिमा, चारित्र्यसंपन्नता हे गुण काळाच्या उदरात गडप झालेत. त्यामुळेच उच्चशिक्षित, प्रतिभावान, चारित्र्यसंपन्न तरुण राजकारणात येतच नाहीत. राजकीय पक्षांनी यावरही जरा विचारमंथन केले पाहिजे.
 महानगरपालिकेची पहिली निवडणूक 1988 साली झाली. कै. शांताराम काळे शहराचे पहिले महापौर !त्यावेळी राजकारण म्हणजे समाजकारण होते. सामाजिक कार्यकर्त्यांना हेरून राजकीय पक्ष त्यांना राजकीय प्रवाहात आणले जात. नेत्यांच्या नजरेत कार्यकर्ता भरला की त्याला संधी मिळे. तशा पारखी नजरेचे नेतेही होते. नि:स्वार्थी, विशाल दृष्टिकोनाचे नेते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत. त्यानंतर दशकभराचा काळ नव्या कार्यकर्त्यांसाठी सुगीचा ठरला. 2000 पासून मात्र अर्थकारणाने राजकारणावर कब्जा केला.  घराणेशाही सुरू झाली. साधारणत: तीन दशकापूर्वी कोणत्याही क्षेत्राला घराणेशाहीची लागण झालेली नव्हती. चित्रपट, शिक्षण, कला, नाट्य अथवा राजकारण या सगळ्या क्षेत्रात कलागुणांना वाव मिळे. राजकारणात धडपड्या आणि समाजसेवी कार्यकर्त्यांना संधी मिळे. अगदी गणपती असो की शिवजयंती या कार्यक्रमात पुढे राहणार्‍या कार्यकर्त्याला राजकीय पक्ष संधी देत. अशाच सामाजिक कार्यक्रमातून पुढारी बनलेल्याची एक पिढीच तयार झाली. त्यात सच्चेपणा होता. मात्र गेल्या दीड-दोन दशकांपासून राजकारणाचा बाज बदलला. जे सत्ताधीश बनले त्यांनी घराणेशाही सुरू केली. नेत्याचा मुलगा नेताच बनू लागला. राजकीय पक्ष अशाप्रकारे नेत्यांच्या कुटुंबात बंदिस्त झाले अन विकासाचे मातेरे झाले !


पहिल्या मनपात 60 जागा !
 औरंगाबाद शहराची मनपा अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या निवडणुकीत 60 नगरसेवक निवडून आले होते.आता ही संख्या 115 वर पोहोचली आहे. गेल्या 32 वर्षात अनेक स्थित्यंतरे झाली. शहराचा प्रचंड विस्तार झाला. उद्योगधंदे आले, व्यावसायिक प्रतिष्ठाने आले, रस्ते मोठे झाले, व्यापार-उदीम वाढला. अनेक सुविधाही झाल्या. मात्र तरीही ज्या वेगाने शहराचा विकास व्हायला हवा होता तो झाला नाही, हेही तेवढेच खरे !


अर्थकारण बनला केंद्रबिंदू !
 राजकारण म्हणजे समाजकारण हे तत्व राजकीय पक्षांनी बासनात गुंडाळल्याने नेते, पुढारी, कार्यकर्ते मग बेफाम सुटले. पक्षनिष्ठा, बांधीलकी, तत्त्व या गुणांना तिलांजली देत राजकीय पक्षांना आपल्या तालावर नाचण्याचे उद्योग सुरू झाले. हे स्थित्यंतर 2005 सालापासून सुरू झाले. नगरसेवकांनी आघाड्या करीत मनपात सरकारे बदलण्याची किमया साधली. राजकारणाचे नवे तंत्र विकसित केले. अर्थकारणावर चालणारा हा सगळा उद्योग पुढे कंत्राटदारीत परावर्तित झाला. 


इथूनच सुरू झाला
पैसो का खेल ! सत्तेतून पैसा !
राजकारणात आलेल्यांनी येनकेन प्रकारे पैसा मिळवण्याचे उद्योग सुरू केले. या नेत्यांची भरभराट पाहून कार्यकर्त्यांचे डोळे विस्परायला लागले. गेल्या दहा-पंधरा वर्षात तर राजकीय क्षेत्रातील नेत्यांची प्रगती बुलेट ट्रेनलाही लाजवणारी आहे. आर्थिक भरभराटीचे सूत्र सापडल्याने मग या क्षेत्रात एकच गर्दी झाली. राजकीय खेळात प्रस्थापितांनी आपल्याच नातलगांची घरे भरली. तीच तीच मंडळी नेते बनू लागली. आता तर या गोष्टीचा अक्षरशः कडेलोट झाला आहे. शहर चालवणारी तीच तीच डोकी उबग आणणारी ठरू लागली. या महानगरपालिकेच्या निवडणुकीत घराणेशाहीवर जनताच हल्लाबोल करेल, यात शंका नाही.


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker