मोटसायकली अंगावर फेकल्या, दगड- फरश्यांचा मुक्त वापर, दीड दिवस उलटला तरी पोलिस दफ्तरी गुन्हा नोंद नाही
औरंगाबाद : होळी पेटविताना पूजेत व्यत्यय आणणार्या टोळक्याला हटकताना झालेल्या बाचाबाचीचे प्रकरण वेदांतनगर पोलिस ठाण्यात पोहचले, मात्र तेथे ते थांबण्याऐवजी पोलिसांच्या साक्षीने त्यांचे तुफान हाणामारीत रुपांतर झाले आणि जे घडते ते पाहण्याशिवाय पोलिसांसमोर पर्याय उरला नाही. दरम्यान या प्रकरणी दीड दिवस उलटूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
सोमवारी रात्री पदमपुरा भागातील नई बस्ती येथे एका मंडळाने आयोजित केलेली होळी पेटविण्यापूर्वी मंत्रोच्चार, पूजन चालू होते. दरम्यान काही अंतरावर एका चारचाकी कार मधून आलेल्या काही मदधुंद तरुणांनी कारचे चारही दरवाजे व डिक्की उघडी केली व मोठ्या आवाजात गाणे लावून नाचगाने सुरू केले. त्यामुळे काही तरुणांनी नाचगाणे करणार्या तरुणांना विनंती केली की, पूजा पूर्ण होईपर्यंत दहा मिनिटे कार मधील साउंड बंद करा. मात्र मदधुंद तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तरुणाच्या दोन्ही गटात तेथेच वाद सुरू झाला. व वादाचे रूपांतर हनामारीत झाले. परिसरातील उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही गट पांगले व एक गट वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला. ही माहिती दुसर्या गटाला मिळाली तेही क्रॉस कम्प्लेन देण्यासाठी वेदांतनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. दरम्यान तेथे दोन्ही गट सामोरासमोर आले. तेथे शाब्दिक वादावादी नंतर दोन्ही गटातील सुमारे 50 ते 60 चा जमाव पोलीस ठण्यासमोरच आपसात भिडला तर त्यामधील काही तरुणांनी चक्क दुचाकी उचलून जमावावर फेकली. हा प्रकार सुरू असताना ठाण्यात मोजकेच पोलिस उपस्थित होते. कारण ठाण्यातील सर्व कर्मचारी अधिकारी हद्दी मध्ये बंदोबस्तात तैनात होते. त्यामुळे दोन्ही गटातील फ्रीस्टाईल हाणामारी बराचवेळ पोलिस ठण्यासमोर सुरू होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेची माहिती होताच शिवसेनेचे आमदार संजय क्षीरसाठ, महापौर नंदकुमार घोडले, गजानन बरवाल आदीं नेते मंडळींनी यावेळी मध्यस्थी केली. वातावरण चिघळू नये यासाठी शीघ्र कृती दलाचे एक पथक नई बस्ती भागात तैनात आहे. या घटनेला दीड दिवस उलटला असून या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करणार
आम्ही फिर्यादीची वाट पाहत आहोत, एक चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.
-रामेश्वर रोडगे, पो.नि.वेदांतनगर.