ईटखेड्यात घोडेले दरबार !
कर्ज देणाऱ्या बँका हाजीर हो $$$
कोरोना संसर्गाच्या काळात महानगरपालिकेच्या माझा वार्ड सुरक्षित वार्ड अभियानाची प्रेरणा घेऊन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी माझा वार्ड कर्जमुक्त वॉर्ड अभियान सुरू केले आहे. ईटखेडा वार्डातील कर्ज घेतलेल्या बचत गटातील महिलांची सहानुभूती मिळविण्यासाठी घोडलेंनी चक्क कर्ज दिलेल्या छोट्या बँकांनाच वेठीस धरले. या बँकांना आज आपल्या दरबारात हजर होण्याचे फर्मान घोडलेंनी काढले आहे. आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी माजी महापौरांचे हे कारनामे बँकांच्या डोक्याला नाहक ताप बनले आहेत
शहरालगतचा ईटखेडा हा माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा सुरक्षित वार्ड समजला जातो. घोडेले कुटुंबाचे राजकीय वर्चस्व या भागात चालते. दोन वेळा महापौरपद भोगलेल्या या कुटुंबाने आता वार्डाची नव्याने राजकीय बांधणी सुरू केली आहे. प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून खडान्खडा माहिती महापौरांचे कार्यकर्ते गोळा करीत आहेत. त्यातच कोरोना संकटाच्या काळात आर्थिक अडचणीत आलेल्या कुटुंबाची माहिती कार्यकर्त्यांनी गोळा केली. वार्डातील बचत गटांच्या महिलांनी शहरातील विविध छोट्या-मोठ्या बँकांकडून कर्ज घेतले आहे. ही संख्या मोठी असल्याने घोडेले यांनी आपले राजकीय घोडे दामटले. गेल्या आठवडाभरापासून प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधत बचत गटातील कर्जाचे हप्ते भरू नका असे आवाहन घोडेले यांचे समर्थक करीत फिरत आहेत. आपण भोगलेल्या पदाचा फायदा घेत माजी महापौर घोडेले यांनी थेट बचत गटांना कर्ज दिलेल्या बँकांना फोन करणे सुरू केले. तीन दिवसांपासून सतत शहरातील वेगवेगळ्या खाजगी पतसंस्था, बँकांना घोडेले यांचे फोन जात आहेत.
आज भरला दरबार !
दरम्यान काल घोडले यांच्या आदेशाने शहरातील छोट्या पतसंस्था तसेच बँकांना फोन करण्यात आले. ईटखेड्यात आयोजित केलेल्या बैठकीला आपला प्रतिनिधी काढण्याचे फर्मान बँकांना सोडण्यात आले. त्यानुसार आज सकाळी अकराच्या सुमारास बँकांचे प्रतिनिधी ईटखेड्यात दाखल झाले.