एकीकडे कोरोनाचे सावट असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात जेईई आणि नीट परीक्षाचा समावेश आहे. मात्र दुसरीकडे बाहेर गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी, रेल्वे, विशेष बससेवा उपलब्ध नाही. तसेच शहरातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह देखील ताब्यात घेऊन तेथे कोरोनाचे रुग्ण ठेवण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी राहणार कुठे असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.
एकीकडे कोरोनाचे सावट पसरल्याने शैक्षणिक संस्था बंद आहेत. त्यात अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी आहे. त्यात शहरातील अनेक विद्यार्थी लॉकडाऊनपूर्वीच गावी गेले आहेत. शिक्षणासाठी बाहेर गावच्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे, बसेसद्वारे आपल्या गावी सोडण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्या होत्या. त्यात आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. याशिवाय नीट, जेईईच्या परीक्षाचा देखील विद्यार्थ्यांना आता अभ्यास करावा लागणार आहे. त्यातच आता विद्यार्थ्यांना गावाकडून परीक्षेसाठी शहरात यायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. अनेकजण तर कोसो मैल पाई चालत आपल्या गावी गेल्याचे देखील उदाहरणे आपल्या समोर आले आहेत. अशा परिस्थितीत आता पुन्हा गावाकडून शहरात येण्यासाठी कसरत करावी लागणार की काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याशिवाय शहरातील विविध वसतिगृह कोरोनामुळे ताब्यात घेतलेले आहेत. त्यात हॉटेलचा खर्च विद्यार्थ्यांना परवडणार का? याशिवाय कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही नातेवाईक देखील अनेकांना जवळ करत नाहीत. अशा परिस्थितीत विद्यार्थी काय करणार असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
सुविधा देण्यात याव्यात
विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी ज्या प्रकारे कसरत करावी लागली त्याप्रमाणे आता पुन्हा शहरात येण्यासाठी कसरत करावी लागू नये. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देखील आता पालकांकडून केली जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, आणि जेवणाची व्यवस्था देखील करणे आवश्यक आहे. अशी मागणी देखील आता होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होतील का? असा प्रश्न काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपस्थित केला जात असून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देखील आता केली जात आहेत.