औरंगाबाद :- महानगरपालिकेवर दीर्घ काळ सत्ता गाजवलेल्या शिवसेना पक्षाने महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन पक्षाचे तिकीट दिले होते. सच्चे, निष्ठावान कार्यकर्ते ही पक्षाची ओळख होती. आजची परिस्थिती पाहिली तर घरी जाऊन टिकीट मिळणे, कुणा कार्यकर्त्याच्या नशीबात आहे हे शोधावे लागेल !
१९८८ ची पहिली महानगरपालिका निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेचा उदयकाल होता. कार्यकर्त्यांची वानवा, जनतेत नसलेली पक्षाची ओळख अशा कठीण परिस्थितीत शहरात शिवसेनेने महानगर पालिकेची निवडणूक लढवली. स्थानिक नेते चंद्रकांत खैरे, प्रदिप जैस्वाल आदी नेत्यांनी रिक्षा चालक, पानटपरी चालक, हॉटेल चालक, किराणा दुकानदार अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना तिकिटांचे वाटप केले. विठ्ठल पेरकर, शिवाजी गवळी, गजानन बारवाल, गिरजाराम हाळनोर, मधुकर शिंदे ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख मिळालेल्या शिवसेनेने पहिल्याच निवडणुकीत तब्बल २७ नगरसेवक निवडून आणले. हिंदुत्वाची लाटच शहरात होती. नगरसेवक पद खुप मानाची आहे असेही यांना उमेदवारांना वाटत नव्हते. अतिशय सामान्य परिस्थितीतील ही राजकीय मंडळी निष्ठेने पक्षाचे काम करी. महानगरपालिकेचे बजेटही साधारणत: २५ कोटींच्या आसपास होते. तर नगरसेवकांना २०-२५ रुपये बैठक भत्ता मिळे. असे असले तरी तो काळ राजकीय प्रामाणिकपणाचा होता. निष्ठावान नेते, कार्यकर्ते यांची फळीच राजकीय पक्षात कार्यरत होती, एवढे मात्र नक्की ! दुसरीकडे देशात आणि राज्यात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या कॉंग्रेस कडे कार्यकर्त्यांची मुळीच कमी नव्हती. पहिल्या मनपा निवडणुकीत तिकिटासाठी पक्षाकडे रांगच लागली. निष्ठावान कार्यकर्ते समाज सेवेची तळमळ असणारे तरुण रांगेत उभे होते. काँग्रेसचे तिकीट मिळणे प्रतिष्ठेचे मानले जाई. सत्ताधारी पक्ष असल्याने तिकीट मिळाले म्हणजे हमखास विजय हेच समीकरण होते. स्थानिक काँग्रेस नेते प्रकाश मुगदिया, केशवराव औताडे, एकबालसिंग गिल, अशोक सायन्ना यादव, चंद्रभान पाखरे या नेत्यांनी निष्ठेने पक्षाचे काम केले. पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले. शिवसेना मोठा सर्वात मोठा पक्ष ठरला तरी अपक्ष मनमोहनसिंग ओबेराय, इकबालसिंग गिल तसेच सहा मुस्लिम नगरसेवक आणि एक ख्रिश्चन नगरसेवक अशी मोट बांधत काँग्रेसने नगरसेवकांची संख्या ३२ पर्यंत नेली. कै. शांताराम काळे शहराचे पहिले महापौर बनले. साधारणत: तीन दशकाच्या निवडणुकीची तुलना आजच्या निवडणुकीशी केली तर एक नगरसेवक आज जेवढा निवडणुकीत खर्च करतो. तेवढे महानगरपालिकेचे वर्षाचे आर्थिक बजेट होते. हे ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही !