कोरोनाची लागण झालेल्या पोलीस परिवाराचे बंद घर फोडून घरातील सोने चांदी रोख रक्कम असा सुमारे दोन लाखाचा ऐवज चोरट्यानी लंपास केल्याची घटना हर्सूल भागातील भगतसिंगनगर मध्ये घडली. गच्चीवरील दरवाजा उघडा राहिल्याने चोरट्यांना डाव साधता आला. ५ ते १३ जुलैदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एमआयडीसी सिडको ठाण्यात असलेले ५३ वर्षीय हेडकॉन्स्टेबल ४ जुलै रोजी धूत हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणीसाठी गेले. सोबत त्यांचा मुलगाही होता. तेथून दोघांनाही एमआयटी कॉलेजच्या कोविड सेंटरमध्ये पाठविले. तेथे तपासणी करून त्यांना कलाग्राम येथे क्वॉरंटाईन करण्यात आले. दरम्यान, ५ जुलै रोजी त्यांचा दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना दोघांनाही अधिक उपचारासाठी धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढे कुटुंबातील सर्वांची तपासणी करण्यासाठी त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ५ जुलैपासून घराला कुलूप लावून ते उपचार घेत होते. १३ जुलै रोजी पोलिस कर्मचारी व त्यांचा मुलगा उपचार संपल्याने सायंकाळी साडेपाच वाजता घरी गेले. तेव्हा घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला.
चोरट्यांनी दोन तोळे सोन्याच्या पुतळ्या, एक तोळ्याची एकदानी, दीड तोळ्याची पोत, चार ग्रॅम, सात ग्रॅम असे दोन लॉकेट, सोन्याचा ओम, सोन्याची अंगठी, सोन्याची नथ, चांदीचे दागिने आणि २२ हजार रुपये रोकड असा एक लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे आढळले. त्यानंतर या प्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले करीत आहेत.
गच्चीवरील दरवाजातून घुसले चोर...
आपल्या सर्वांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे समजल्यावर कुटुंबियांमध्ये भिती पसरली होती. त्यात सर्वांना उपचाराला नेण्यासाठी गाडी येणार हे समजल्यावर त्यांनी आवश्यक ते सामान घेऊन पटकन समोरील लोखंडी ग्रीलला कुलूप लावले आणि बाहेर पडले. परंतु, या घाई गडबडीत गच्चीवरील दरवाजा उघडा राहिला. त्यामुळे चोरट्यांनी बाहेरील भिंतीवरून गच्चीवर प्रवेश केला आणि उघड्या दरवाजातून ते घरात घुसले. आत गेल्यावर सर्व दरवाजे केवळ कडी लावलेले होते. त्यामुळे ते उघडून चोरटे ऐवज असलेल्या कपाटापर्यंत सहज पोहचू शकले, अशी माहिती पोलिसांच्या पाहणीत समोर आली आहे.











