वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर नगरनाका येथून प्रवासी म्हणून ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या दोन व जोगेश्वरी फोस्टर कंपनीमागील तीन अशा पाच भामट्यांनी सदर रिक्षाचालकास तलवार, चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यास त्याच्याच वाहनात बळजबरीने कोंबून अपहरण केले.
त्याचा मोबाइल व पैसेही घेतले. तसेच १० लाखांची मागणी करत रिक्षा कायगाव टोका भागातील एका पंपावर आणली. येथे पाचही जणांनी तेथील कर्मचाऱ्यास धमकावत लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नागरिकांच्या तत्परतेने गंगापूर पोलिसांनी वेळीच धाव घेत, पाचपैकी तिघांना ताब्यात घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.
गणेश सदाशिव कदम (३८, सिद्धेश्वर कॉलनी, कमळापूर) हे छत्रपती संभाजीनगर ते वाळूज एमआयडीसी भागात रिक्षा (एमएच-२०, ईक-५६४५) चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी (दि.११) सायंकाळी ६:४० वाजता शहरातून एमआयडीसीकडे जात असताना नगरनाका येथून जोगेश्वरीला जाण्यासाठी दोन प्रवाशांना त्यांनी रिक्षात बसवले. यावेळी दोघांनी अन्य तीन साथीदारांना संपर्क साधून फोस्टर कंपनी मागे बोलावले.
यावेळी वरील पाच जणांनी रिक्षाचालक कदम यांना तलवार व चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच बळजबरीने वाहनात कोंबून मोबाइल व रोख २ हजार ८०० रुपये हिसकावून घेतले. पत्नीला संपर्क साधून पतीला ठार मारण्याची धमकी दिली. धमकी फोन पेद्वारे तीनवेळा १५ हजार रुपये उकळले. दरम्यान, भामट्यांनी वाळूजमार्गे गंगापूरकडे जाताना रामराई तलाव परिसरात रिक्षा थांबवून १० लाख रुपयांची मागणी केली.
यावेळी कदम यांनी नकार देताच, रिक्षा पुणे महामार्गावरुन कायगाव टोका-गंगापूर येथील पेट्रोल पंपावर घेऊन गेले. यावेळी त्यांनी तलवार काढून पंप कर्मचाऱ्याला धमकी देत पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी पोलिसांना कळविताच गंगापूर पोलीस येथे पोहोचले.
-- रिक्षातील दोन संशयित फरार --
गंगापूर पोलिसांनी रिक्षामधील पाचपैकी
तिघांना ताब्यात घेतले. तर दोघेजण फरार झाले. पोलिसांनी खाक्या दाखवताच अपहरणाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी रिक्षा, चालकासह तिघा भामट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रिक्षाचालक गणेश कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन मच्छिंद्र जाधव (२०, रा. बायजीपूरा), शुभम विजय आव्हाड (१९, रा. न्यायनगर, हुसैन कॉलनी गल्ली नं-१२, पुंडलिकनगर) व जोगेश्वरी येथील एक विधी संघर्षग्रस्त, तर पळून जाणारे अभिषेक बनकर (१८, रा. रांजणगाव शेणपूंजी व रोहन दीपक गुंडेकर (१८, रा. जोगेश्वरी) यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.













