असा करूया ‘कोरोना’शी सामना
सांजवार्ता ऑनलाईन Mar 11, 2020
सध्या कोरोना हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. कोरोना व्हायरस ज्याला कोवीड 19 असं ही म्हणतात त्याने पूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं आहे. कोरोना वर सध्यातरी कोणती लस उपलब्ध नसली तरी ती विकसित करण्याचे आणि ह्याचा प्रसार थांबवण्याचे प्रयत्न जगभर सुरु आहेत. भारतात ही ह्या व्हायरस ची लागण झालेल्या काही व्यक्ती आढळल्या असल्याने सगळीकडे भितीच वातावरण आहे. फेसबुक आणि इतर सोशल मिडिया वरून अनेक प्रकारच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. ह्या आजाराविषयी श्री.विनीत वर्तक ह्यांनी अतिशय मोलाची माहिती मिळवली आहे . त्यांनी केलेल्या संशोधनानुसार हा आजार गंभीर आणि पसरणारा असला तरी काही गोष्टी आपण पाळल्या तर नक्कीच स्वतःचा बचाव करू शकतो. 2009 मध्ये आलेल्या स्वाईन फ्लू ची लागण जवळपास 60.8 मिलियन लोकांना झाली होती. 2014 मध्ये इबोला मुळे 11,000 पेक्षा जास्ती लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. इबोला ची लागण झाल्यावर मृत्युमुखी पडण्याची शक्यता जवळपास 25% इतकी होती. आता सध्या उद्रेक झालेला कोरोना कुठवर आहे ते बघू. साधारण पूर्ण जगात 94,000 लोकांना ह्याची लागण झाली आहे. 82 देशात हा रोग आत्तापर्यंत पसरलेला आहे. 3200 लोकं ह्यामुळे दगावली आहेत. ह्यातली 3000 पेक्षा जास्ती एकट्या चीन मधून आहेत. लागण झालेल्या 94,000 लोकांमधली जवळपास 51,000 लोकं ही बरी झाली आहेत. ( जवळपास 54% अधिक ) उरलेल्या लोकांमध्ये 33,000 पेक्षा जास्ती माईल्ड लेव्हल वर आहेत. (म्हणजे गंभीर स्वरूप नाही) साधारण 7000 लोक अशी आहेत जी गंभीर अवस्थेत आहेत. ( ह्या 7000 मधील 6400 लोक चीन मधील आहेत जिकडे ह्याचा उद्रेक झाला आहे.) कोरोना मध्ये दगावलेल्या सर्व व्यक्तींमध्ये 0-9 वर्षामधील पूर्ण जगात कोणीच नाही. एकूण दगावलेल्या व्यक्तींमध्ये वयाच्या 50 वर्षाच्या आतल्या व्यक्तींची टक्केवारी अवघी 0.4% इतकी आहे. 80 वर्षापेक्षा अधिक असलेल्या लोकांमध्ये हेच प्रमाण 22% इतकं आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये निरोगी लोकांच प्रमाण हे 0.9% इतकच आहे. ज्यांना आधी कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हॅस्कुलर डिसीज आहेत त्यांना कोरोना होण्याची शक्यता जास्ती आहे. धूम्रपान करणार्या लोकांना कोरोना ची लागण होण्याचा धोका हा जास्ती आहे. कोरोना ची लागण पुरुषांमध्ये होण्याचं प्रमाण स्री पेक्षा जास्ती आहे कारण स्री ची इम्युनिटी सिस्टीम ही पुरुषापेक्षा चांगली असल्याने स्री ला लागण होण्याचं प्रमाण कमी आहे. वरील आकड्यावरून हे सहज लक्षात येते की कोरोना अतिशय वेगाने पसरत असला आणि गंभीर असला तरी सुदृढ शरीर असणार्या लोकांना त्याची लागण होण्याची शक्यता कमी आहे. लागण झाल्यावर वेळेवर उपचार केल्यास त्यातून पूर्ण बरी होण्याची शक्यता ही जास्ती आहे. पण तरीही आपण काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. 1) आपले हात नियमित साबणाने धुवत जा. बाजारात उपलब्ध असलेल्या अल्कोहोल बेस सॅनिटायझर चा वापर करा. 2) कोणीही शिंक अथवा खोकत असेल तर त्याच्या/ तिच्या पासून साधारण 1 मीटर (3 फूट ) लांब रहा. 3) आपल्या हाताने नाक, तोंड, डोळे ह्यांचा स्पर्श टाळा. स्पर्श करायचा असल्यास हात धुवून अथवा सॅनिटायझर ने स्वच्छ करून मग स्पर्श करा. ( हात सतत स्वच्छ ठेवणं हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे हाताकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. ) 4) सर्दी, खोकला, ताप असल्यास लगेच डॉक्टरी उपचार घ्या. त्या काळात घरीच आराम करा. गर्दीची ठिकाणे अथवा इतरांसोबत आपलं मिसळणं काही दिवस बंद करा. 5) फेस मास्क वापरताना काळजी घ्या. एकच मास्क अनेकवेळा वापरू नका. मास्क घालताना हात स्वच्छ धुवून घ्या. तसेच काढल्या नंतर पुन्हा हात स्वच्छ धुवा तसेच वापरलेल्या मास्क ला योग्य तर्हेने नष्ट अथवा कचर्यात टाका. कोरोना (कोवीड 19) हे जागतिक संकट आहे. तुम्ही, आम्ही मिळून त्याचा सामना करायचा आहे. तेव्हा काळजी घेऊया आणि न घाबरता त्याचा मुकाबला करूया.