आमदारांना गेटवर अडवले

Foto
24 तासानंतरही कोरोना रिपोर्ट मिळेना : अजितदादा संतप्त
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची आरोग्य तपासणी सक्तीची करणारे सरकार आज सपशेल तोंडघशी पडले. चोवीस तासानंतरही चाचणी रिपोर्ट न मिळाल्याने अनेक आमदारांना सुरक्षा अधिकार्‍यांनी गेटवरच अडविले. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना ताटकळत ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले. दुसरीकडे विरोधकांनी कोरोनासह इतर मुद्द्यावर विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. याचा फटका मंत्रालयीन कामकाजाला सुद्धा बसला. अखेर विधिमंडळाचे कामकाज आता सुरू झाले आहे. पण पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले.
विधिमंडळाच्या गेटवर येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची स्वॅब घेऊन रिपोर्ट दिले जात होते. पण, स्वॅब घेऊनही काही आमदारांना रिपोर्ट न दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. ’टेस्ट करून 24 तास झाले पण रिपोर्ट मिळत नाही. त्यामुळे आम्हाला अधिवेशनात जाता येत नाही, या सरकारने काही एजंट ठेवले का रिपोर्ट मिळेल का, असा सवाल करत  माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासोबत सेनेच्या आमदारांनीही आपली अडचण बोलून दाखवली. त्याचवेळी अजित पवार हे तिथे पोहोचले. हरीभाऊ बागडे यांनी झालेला प्रकार अजितदादांच्या कानी घातला. त्यानंतर विधिमंडळाच्या गेटवरच अजितदादांनी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावून काढले. 
असे कसे काम चालणार आहे,  आमदारांचे रिपोर्ट दिले नाहीतर ते आतमध्ये जातील कसे? ताबडतोब सर्व आमदारांचे चाचणी झालेले रिपोर्ट द्या आणि सर्वांना आतमध्ये सोडा, असे आदेशच अजित पवारांनी अधिकार्‍यांना दिले. अजितदादांनी आपल्या स्टाईलने फटकारून काढल्यामुळे कर्मचारी आणि अधिकार्‍यांची एकच धावपळ उडाली. सर्व आमदारांचे रिपोर्ट तातडीने देण्यात आले. त्यानंतर सर्व आमदार हे विधिमंडळात पोहोचले. दरम्यान, विधिमंडळाच्या दारावर   वैद्यकीय प्रवेशासाठी असलेले प्रादेशिक आरक्षण अट रद्द करा या मागणीसाठी मराठवाड्यतील काही आमदारांनी घोषणाबाजी  केली. याबाबत तातडीने सर्व अधिकारी यांना बोलवा आणि बैठक लावतो असे सांगत अजित पवार यांनी या आमदारांना आश्वासन दिले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker